तिमाही वनमजुरांवर उपासमारीची पाळी, दोन वर्षांपासून वेतन नाही पत्रपरिषदेत आंदोलनाचा इशारा

श्याम चटपलीवार भद्रावती 


तिमाही वनमजुरांवर उपासमारीची पाळी, दोन वर्षांपासून वेतन नाही
 
पत्रपरिषदेत आंदोलनाचा इशारा

       
भद्रावती वनपरिक्षेत्रातील ११ तिमाही वनमजुरांना दोन वर्षे लोटुनही अद्याप वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असून आमचे वेतन त्वरित देण्यात यावे अन्यथा आम्ही आंदोलन करु असा इशारा पिडीत वनमजुरांनी पत्रपरिषदेत दिला. 
      पत्रपरिषदेत पिडीत वनमजुरांनी सांगितले की, आम्ही वर्ष २०१९,२०,२१ मध्ये कोणी तीन महिने, कोणी सहा-सात महिने वनमजूर म्हणून काम केले आहे. एका महिन्याला दहा हजार रुपये वेतन याप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात येते. त्यानुसार एका वनमजुराचे ३० ते ७० हजार रुपये वेतन वनविभागाकडे दोन वर्षांपासून थकीत आहे. सध्या आम्हाला काम नाही आणि थकीत वेतनही मिळाले नाही. त्यामुळे आमच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आमचे थकीत वेतन त्वरित देण्यात यावे अशी मागणी या पिडीत वनमजुरांनी पत्रपरिषदेत केली. 
      यासंदर्भात दि.२ मार्च २०२२ रोजी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, जिल्हाधिकारी,  विभागीय वन अधिकारी चंद्रपूर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती यांना निवेदन सादर केले. तसेच आ.प्रतिभाताई धानोरकर आणि उपविभागीय अधिकारी वरोरा यांना प्रत्यक्ष भेटून आपली समस्या सांगितली. परंतु अजुनपर्यंत आमची समस्या सुटली नाही. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तसेच अलिकडेच दि.१ सप्टेंबर रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी विभागीय वन अधिकारी यांना विचारणा केली असता चार-पाच दिवसांत थकीत वेतन देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र १७-१८ दिवस लोटुनही अद्याप थकीत वेतन मिळाले नाही. असेही पत्रपरिषदेत सांगण्यात आले. १५ फेब्रुवारीपासून १५ जूनपर्यंत दरवर्षी वनमजुरांमधूनच फायर वाचर नियुक्त केले जातात. परंतु त्यांना एक ते दीड महिन्यातच कामावरुन काढले जाते. कुशल-अकुशल कामगारांना तीन महिन्यांसाठी ठेवले जाते. परंतु त्यांना वर्षभर कामावर ठेवले जात असल्याचा आरोपही या वनमजुरांनी पत्रपरिषदेत केला. 
      पत्रपरिषदेला भद्रावती उपक्षेत्रातील खुशाल कंचनवार, ईश्वर कलारे, मासळ उपक्षेत्रातील हंसराज मांदाडे, चोरा उपक्षेत्रातील शत्रुघ्न खडसंग, धनराज पोईनकर, गोवर्धन रंगारी, उमेश मगरे, देविदास गराटे इत्यादी वनमजूर उपस्थित होते. दरम्यान यासंदर्भात भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

प्रतिनिधी शाम चटपल्लीवार
भद्रावती

0/Post a Comment/Comments