नाल्यात कोसळला ट्रक जीवितहानी टळली ; गावात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

नाल्यात कोसळला ट्रक 


जीवितहानी टळली ; गावात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी

भास्कर फरकडे
गडचिरोली वार्ता न्यूज


चंद्रपूर, 10 सप्टेंबर :- लोहखनिज भरलेला 14 चाकी ट्रक नाल्यात कोसळल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील गणपूर ते आक्सापूरजवळ मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ट्रक नाल्यात कोसळल्यानंतर चालक फरार झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथून लोहखनिज बल्लारपूर व राजुरात आणले जाते. अहेरी ते बल्लारपूर मार्गावर दररोज शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असते. गोंडपिपरीकडून एमएच 33 डब्ल्यू 5550 क्रमांकाचा ट्रक लोहखनिज भरून भरधाव येत होता. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक आक्सापूरजवळील नाल्यात कोसळला.
लोहखनिज भरलेला 14 चाकी ट्रक नाल्यात उलटल्याने लाखोंची हानी झाली आहे. कंपनीने सुरजागड - एटापल्ली मार्गावर प्रत्येक गावात सुरक्षरक्षकाची नेमणूक केली. त्या धर्तीवर आष्टी ते बल्लारपूर मार्गावर सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी भाजप किसान सेलचे महामंत्री बंडू गौरकार यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments