काय आहे वेदांता फॉक्सक्वान प्रकल्प? या प्रकल्पावरून विरोध का होत आहे? प्रा डॉ सुधीर अग्रवाल


काय आहे वेदांता फॉक्सक्वान प्रकल्प? या प्रकल्पावरून विरोध का होत आहे?

प्रा डॉ सुधीर अग्रवाल

वेदांता-फॉक्सक्वान प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
गुजरातमध्ये हा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारल्यानंतर जवळपास १ लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं गुजरातचे मुख्यमंत्री पटेल यांनी सांगितलं. या दोन्ही कंपन्यांना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असंही ते म्हणाले. परंतु हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राताला मोठं नुकसान झालं असून नोकरीच्याही अनेक संधी हुकल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने १ लाख नोकऱ्याही महाराष्ट्रातून बाहेर गेल्या. महाराष्ट्राच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ झाली असती, स्थानिक इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला मोठं प्रोत्साहन मिळालं असतं.

काय आहे सेमीकंडक्टर प्रकल्प ?

अहमदाबादमध्ये १००० एकर जमिनीवर हा प्लाँट उभारला जाणार आहे. या प्रोजेक्टमधून जवळपास १ लाख रोजगारही उपलब्ध होतील. प्रस्ताविक सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिकेशन युनिट २८ nm टेक्नोलॉजी नोड्सवर काम करेल. फॉक्सकॉन आणि वेदांत या दोन्ही कंपन्या मिळून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात काम करत आहेत. फॉक्सकॉन ही तायवानची कंपनी आहे. परंतु आता फॉक्सकॉन मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करत आहे, कारण तायवानचे चीनशी असलेले संबंध खराब झाल्यानंतर या कंपनीचं लक्ष भारतावर अधिक आहे.

मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना यामुळे मोठा फटका बसला होता. यामुळेच सेमीकंडक्टरबाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या ‘आत्मनिर्भर भारत’कडे एक पाऊल पुढे टाकत सोमवारी वेदांता समूहाने तैवानमधील फॉक्सकॉन कंपनीसोबत २० अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये अहमदाबादजवळ सुरू करणार असल्याची घोषणा केली.

वेदांत आणि फॉक्सकॉन यांनी मंगळवारी गुजरात सरकारसोबत राज्यात प्लांट स्थापन करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत गांधीनगरमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदान, इतर मदत जाहीर केली आहे. एका वृत्तानुसार, वेदांता समूहाने मोफत १००० एकर जमीन ९९ वर्षांसाठी मागितली होती. त्याशिवाय स्वस्त, वाजवी दरात पाणी-वीज मागितली होती, असे सूत्रांनी सांगितले.

भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ २०२० मध्ये १५ अब्ज डॉलर इतकी होती. ही बाजारपेठ २०२६ पर्यंत ६३ अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. आगामी डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता सेमीकंडक्टरला मोठी मागणी असणार आहे. चीन-तैवानमधील तणाव, कोरोना महामारी साथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला विदेशातून होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.

९५६१५९४३०६

0/Post a Comment/Comments