*....तरच भावी पिढी संस्कारांचे अनुकरण करेल:भाग्यश्रीताई आत्राम*

*....तरच भावी पिढी संस्कारांचे अनुकरण करेल:भाग्यश्रीताई आत्राम*

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबिर*

*मुलचेरा:-* शिक्षणाची दारे खुली झाल्यावर स्त्रीने आपल्या प्रगतीचा वेग वाढवला आहे. मानवी जीवनातील कुठलेही क्षेत्र तिला आता नव्हे राहिलेले नाही. पुरुषाच्या बरोबरीने ती प्रत्येक क्षेत्रात अगदी रणांगणावर आपली कर्तबदारी गाजवत आहे. एकविसाव्या शतकात मानवी हक्कांची जपणूक करण्यासाठी स्त्री-पुरुष समानतेला महत्त्वपूर्ण स्थान दिले तरच भावी पिढी या संस्कारांचे अनुकरण करेल असे प्रतिपादन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.

शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या महिलांविषयक व विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तसेच महिलांच्या स्थानिक विविध शासकीय विभागांशी संबंधीत समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 24 मे रोजी स्थानीक पंचायत समितीच्या सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी तहसीलदार सर्वेश मेश्राम, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) अर्चना इंगोले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास, गटविकास अधिकारी एल.बी.जुवारे, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, पंचायत समितीचे कृषी अधिकारी युवराज लाकडे, गटशिक्षणाधिकारी गौतम मेश्राम, बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जावेद शेख,सुंदरनगर चे सरपंच जया मंडल,प्राचार्य शैलेंद्र खराती आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यांसाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक तालुका स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र,यासाठी स्वतः महिलांनी पुढे येऊन समस्या मांडण्याची गरज आहे.या शिबिराचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी समोर यावे आणि समस्या मांडावे असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना शाहीन हकीम यांनी आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत.समाजाने त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात स्त्री पुरुष समानता या विषयाची जागरूकता वाढविणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.उप मुख्यकार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले यांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे भरपूर समस्या आहेत.मात्र,समस्या घेऊन महिला समोर येत नसल्यानेच शासनाने अश्या शिबिरांचे आयोजन केले आहे.त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी समोर येऊन समस्या मांडावे,तेंव्हाच महिलांच्या समस्यांचे निराकरण होणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद हटकर यांनी शिबिराबाबत योग्य माहिती देत महिलांच्या विविध विभागांशी संबंधित विविध समस्या प्रधान्याने सोडवीन्यात येणार असल्याचे सांगितले.आयोजित शिबिराचे सुत्रसंचलन तलाठी रितेश चिंदमवार यांनी केले तर शिबिरात तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments