महाराष्ट्रात पुणे येथे होणार डिजिटल विंगचे अधिवेशन



व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेतील डिजिटल विंगचे अधिवेशन लवकरच पुण्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. डिजिटल विंगच्या राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीला व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, डिजिटल विंगचे अध्यक्ष जयपाल गायकवाड, कार्याध्यक्ष मनोज साखरे, राज्य उपाध्यक्ष संतोष धायबर, सोमनाथ गिते, सरचिटणीस के. अभिजित, अशोक गव्हाणे, महेश घोलप, सूरज पाटील, किशोर ससाणे, देवनाथ गंडाटे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दिव्या भोसले यांनी प्रारंभी व्हॉईस ऑफ मीडियाच्या स्थापना व संघटनेच्या कार्यशैलीबद्दल सर्वांना अवगत केले. पंचसूत्रीवर सुरू असलेल्या कामाची माहिती त्यांनी यावेळी बैठकीला उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना दिली. या पंचसूत्रीचा डिजिटल माध्यमातील पत्रकारांना कसा फायदा होणार आहे, याचे विस्तृत विवेचनही त्यांनी केले.

डिजिटल विंगचे अध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी कार्यकारिणीच्या कामाचा आढावा सादर केला. डिजिटल विंगची संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी पूर्ण झाल्याचे गायकवाड यावेळी म्हणाले. राज्य शासनाने अलीकडेच रेडिओ, ईलेक्ट्रॉनिक्ससह डिजिटल माध्यमांचा श्रमिक वर्गवारीत समावेश केला आहे. डिजिटल माध्यमातील पत्रकार आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या लढ्याचे हे मोठे यश आहे. त्याचे श्रेय संदीप काळे व संघटनेला जाते असे गायकवाड यावेळी म्हणाले.

बैठकीला मार्गदर्शन करताना संदीप काळे म्हणाले की, व्हॉईस ऑफ मीडियाचे ‘व्हिजन आणि मिशन’ प्रचंड मोठे आहे. पत्रकारितेचा आवाकाही मोठा आहे. त्यामुळे आपल्याला चांगले काम करायचे आहे. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील डिजिटल पत्रकारांना एकसंघ करायचे आहे. डिजिटल मीडिया हा अलीकडच्या काळातील बदलते आणि प्रचंड शक्तीशाली माध्यम बनले आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमातील पत्रकारांसाठीदेखील व्हॉईस ऑफ मीडिया तितक्याच ताकदीने लढणार आहे. पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या अनुषंगाने बोलताना काळे म्हणाले की, डिजिटल माध्यमातील पत्रकारांचे अधिवेशन आजवर कुठेही झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे व्हॉईस ऑफ मीडियाच्या डिजिटल विंगचे अधिवेशन विचारमंथनाचे केंद्र ठरावे.

0/Post a Comment/Comments