धनादेशावर बनावट सही करून ग्रामकोष समितीचे ३५ लाख रूपये केले हडप


फाईल फोटो 

एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायतील प्रकार

आरोपीचा शोध घेण्याचे यंञनेपुढे आव्हान



गडचिरोली:- एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायत तोडसा अंतर्गत येणाऱ्या ग्रामसभा कोष समितीच्या बँक खात्यांमध्ये असलेली सुमारे ३५ लाख ३ हजार ११६ रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने २० पेक्षा अधिक धनादेशांच्या माध्यमातून तीन वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर करून हडप केली आहे.चौकशी समितीने यासाठी ग्रामसेवक व ग्रामकोष समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्षांना जबाबदार धरत त्यांनी ही रक्कम समान हिश्शात भरून द्यावी ,अन्यथा फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पंचायत समितीने पाठविलेल्या पञात दिला आहे.या पञामुळे एकच खळबळ माजली आहे.

तोडसा ग्रामपंचायती अंतर्गत दोड्डी (स) ,आलेंगा, दोड्डी (म ),तोडसा ,पेठा , एकरा बुज, एकरा खुर्द, झारेवाडा ,कारमपल्ली ,लांजी ही दहा गावे येतात .या दहा गावांचे सात ग्रामकोष समिती आहेत.या ग्रामकोष समितीत तेंदूपत्ता बोनस व पाच टक्के अबंध निधी होता.विशेष म्हणजे प्रत्येक गावाचे स्वतंत्र बँक खाते आहे.ग्रामसेवक हे ग्रामकोष समितीचे सचिव राहत असल्याने धनादेश ग्रामसेवक डी. झेड.पिल्लारे यांच्याकडे राहत होते.हे धनादेश ग्रामकोष अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सचिव यांच्या स्वाक्षऱ्यांनी वठतात.सदर धनादेश ग्रामसेवकाच्या घरून गहाळ झाले.अज्ञात व्यक्तीने प्रत्येक खात्यात असलेली दीड ते दोन लाखांची रक्कम दुसऱ्या खात्यांमध्ये वर्ग केली व हडप केली.विशेष म्हणजे दहा गावांचे तेंदूपत्ता बोनस व अबंध निधीचे असे दोन खाते असे एकूण २० बैंक खाते आहेत.अज्ञात व्यक्तीने २० पेक्षा अधिक धनादेशांवर बँकेत वठवून त्याची रक्कम दुसऱ्या खात्यात वळती केली.हा प्रकार ऑक्टोबर महिन्यात घडला.मात्र ग्रामसेवकाने या प्रकरणाची तक्रार केली नाही.ही बाब ग्रामकोष समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी पंचायत समिती कडे तक्रार केली.या प्रकरणाचा तपास अतिशय संथगतीने करण्यात आला आहे.धनादेशांवर ग्रामसेवक,ग्रामकोष अध्यक्ष ,उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने त्यांना जबाबदार धरत सम प्रमाणात रक्कम दि.१० जूनच्या आत संबंधित बँक खात्यात जमा करावी.त्याची पोचपावती पंचायत समितीला सादर करावी अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा ग्रामपंचायतीला पाठविलेल्या पञाव्दारे दिला आहे. .

0/Post a Comment/Comments