अवयदानाबाबत जनजागृती करण्याची गरज प्रा डॉ सुधीर अग्रवाल




अवयवदानाबाबत राज्यात जागृती वाढत आहे. राज्यातील प्रत्येक भागातून मरणोत्तर अवयवदान करण्यासाठी स्वेच्छेने अर्ज भरली जात आहेत.
ज्या व्यक्तीचामेंदू डेड होतो त्या व्यक्तीच्या अंग प्रत्यारोपणाचा निर्णय मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी घ्यायचा असतो. त्यात मृत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली आहे किंवा नाही, या पेक्षाही नातेवाइकांची अवयव दानास सहमती जास्त महत्त्वाची असते. गेल्या पाच वर्षांमध्ये नातेवाईक अवयव दानाकडे सकारात्मक दृष्टीने बघू लागले आहेत. आपली जवळची व्यक्ती हे जग सोडत असताना इतर गरजू रुग्णांना जीवनदान देत असल्याची उदात्त भावना नातेवाइकांनी स्वीकारली आहे. त्यातून हा बदल होत असल्याचे दिसून येत आहे. अवय दानाचे अनन्य साधारण महत्त्व आता समाजात रुजवायला लागल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर महिलेच्या अवयदानासाठी तिचे नातेवाईक परवानगी देणे हे याचे द्योतक आहे. नातेवाईकांचा संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतमजूर महिलेचे नागपुरात अवयदान केल्याने दोघांना जीवनदान मिळाले. असलेल्या मंदाबाई च्या नातेवाईकांनी दोन्ही मूत्रपिंड दान देऊन सामाजिक दायित्व पार पाडले. या वर्षातील सतरावे हे अवयदान होते तर २०१३ ते आतापर्यंत ११२ व्यक्तीकडून अवयदान झाले. अवयदानाबाबत मोठया प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. हव्या त्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत जागृती करण्याचं काम केले जात नाही. विशेष करून खाजगी रुग्णालयामध्ये अवयदान करण्यापेक्षा सरकारी रुग्णालयामध्ये अवयव दान मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. जर ते झालं तर त्याचा उपयोग विशेष करून सर्वसामान्य जनतेला होईल. कारण खाजगी रुग्णालयामध्ये अवयव दान होत असले तरीसुद्धा त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पैशाच्या देवाण घेवाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर यापूर्वी अवयव दानासाठी ग्रीन कॉरिडोर उपलब्ध करून दिले जात असत. आता ते प्रमाणही कमी झाले आहे. एकूणच काय तर लोकांमध्ये जागृती मोठ्या प्रमाणात व्हायला हवी.

आज भारतात दीडशे कोटीची लोकसंख्या असून सुद्धा भारतामध्ये फक्त दोन ते तीन टक्के अवयदान होत आहे. तसेच वर्षाला दिड ते दोन लाख किडनी ट्रान्सप्लांट ची गरज असते. यकृताची संख्या सांगायची झाली तर, यकृत ट्रान्सप्लांटसाठी वर्षाला ८० ते ८५ हजार यकृतांची गरज असते. परंतु आपल्याकडे फक्त दोन ते तीन टक्के लोकच अवयव दान करतात, म्हणूनच विशेष करून ब्रेनडेड किंवा अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे अवयव दान मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे.. जर घरच्या लोकांची समजूत काढण्यात किंवा त्यांना त्यांचे महत्त्व पटवून देण्यात आपण यशस्वी झालो तर, त्याचा मोठा फायदा इतरांना होईल.

अवयवदानामुळे इतरांना नव्या आयुष्य जगण्याची संधी मिळते. त्यामुळे, अवयवदान करणं हे खूप गरजेचं आहे. याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. जेणेकरून अधिकाधिक लोक पुढाकार घेऊन अवयवदान करतील. यासाठी अवयवदानाची एक चळवळ उभी करणं आवश्यक आहे, या हेतूने राज्य सरकारने महा-अवयवदान या अभियानाला मोठया प्रमाणात सुरूवात करायला पाहिजे. अवयवाला कोणताही धर्म नसतो. अवयव माणसाचा जीव वाचवू शकतो.

जर मृतव्यक्तीचे जवळचे नातेवाईक म्हणजे आईवडील किंवा अपत्य यांनी अवयवदान करण्यासाठी कायदेशीररीत्या संमती दिली, तरच अवयवदानाची प्रक्रिया पुढे सरकते. मात्र, या अवयवदानाच्या बदल्यात त्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या खर्चामध्ये सवलत किंवा काही मोबदला देता येणार नाही. कारण, अवयवदान हे ऐच्छिक असते, व्यावसायिक नसते. तसेच हे अवयवदान जरी केले तरी, ते अवयव कोणाला दान द्यायचे आहेत, हे त्या मृतव्यक्तीचे नातेवाईक किंवा डॉक्टर ठरवू शकत नाहीत. त्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य विभागाची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. जी केंद्रीय असून राज्यस्तरीयही आहे. या व्यवस्थेकडे त्या त्या स्तराच्या रुग्णालयातील अवयव मिळण्याची गरज असलेल्या रुग्णांची यादी असते. रुग्णांच्या नोंदणी ज्येष्ठतेवरून आणि संबंधित सर्व प्रकिया पूर्ण करण्याच्या अटीवरून जे रुग्ण पात्र आहेत, त्यांनाच अवयवदान करण्यात येते. या सर्व प्रकियेत अवयवदान या क्षेत्रातील तज्ज्ञांची भूमिका मोलाची असते. कारण, अवयवदान करून एखाद्याला जीवदान देणे हे दैवीच कार्य असते.

९५६१५९४३०६

0/Post a Comment/Comments