ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर गावाचा देशात नाव



सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा पंतप्रधानांच्या हस्ते होणार सत्कार

          

 ब्रह्मपुरी : शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेलं 564 लोकसंख्या असलेला व 141 कुटुंब संख्या असलेल छोटसं लाखापूर हे गाव आज देशभर गाजत आहे. ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, केंद्र सरकारकडून हर घर नल योजना सुरू करण्यात आली आहे. जिथे आजही लोकांच्या घरात किंवा आसपासच्या भागात पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. अशा गावांमध्ये प्रत्येक घरी नलजल मिळाला पाहिजे, यासाठी ही योजना काम करते. या योजनेचा पुरेपूर लाभ घेत लाखापूर हे गाव शंभर टक्के यशस्वी झाले आहे. त्यासाठी ज्यांनी अथक मेहनत घेतली त्या गावच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला दिल्ली येथे लाल किल्यावर सन्मान होणार आहे. 
                 लाखापुरला आज प्रत्येक घरी नळाच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी पोहचते आहे. आज गावाला पिण्याचे व शेतीचे पाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. आज पाण्याची कुठलीही अडचण नाही. परंतु हे काहीच सहजतेने झालं नाही. चारही बाजूने जंगलांना व्यापलेले हे छोटसं गाव तसं तर दुर्लक्षितच होता. गावाला दोन नैसर्गिक तलाव असतानाही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होता. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. लाखापूर ग्रामपंचायत ची स्थापना 1962 ला झाली. 1978 ला नळ योजना गावात आली. नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 1997 मध्ये एक लक्ष लिटरची क्षमता असलेल्या पाण्याची टाकीचे निर्माण करण्यात आलं होतं. परंतु पाण्याची वणवण काही थांबली नव्हती. ज्या सार्वजनिक विहिरीच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा केला जात होता, ती विहीरीची पातळी उन्हाळा ऋतूमध्ये कमी होत असल्यामुळे गावाला पाण्याचा तुटवडा होत होता. गावाला पाण्याची टंचाई भासत होती. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावा लागत होते.
अशावेळी गावाला टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध केल्या जात होतं. ग्रामपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे पाण्याच्या पूर्ततेसाठी मागणी करण्यात आली. गावाच्या विकासाला खरी सुरुवात 2015 पासून झाली. जिल्हा परिषदेच्या निधीच्या माध्यमातून गावामध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात आली व हर घर नल योजना अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाचे पाणी जाईल अशी व्यवस्था करण्यात आली. सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी कनिष्ठ अभियंता मेश्राम यांच्याकडे मागणी करत नाल्यावर असलेल्या विहिरीला 2022 ला सरफेस बोर मारली. त्यामुळे गावाला मुबलक पिण्याचा पाण्याची पुरवठा व्हायला लागला आहे. आज गाव सुजलाम सुफलाम आहे. गावामध्ये एकूण कुटुंब संख्या 141 आहे व 141 घरी नळ जोडणी केली आहे. म्हणजेच शंभर टक्के नळाद्वारे पाणीपुरवठा केल्या जातो. गावाच्या एका बाजूला तलाव, एका बाजूला नाला, गावाला लागून गोसेखुर्द धरणाचे नहर तर एका बाजूला छोटा नाला आहे. त्यामुळे गावाला आता शेतीला पण मुबलक पाणी पुरवठा होत आहे. ज्या गावाला एक वेळ पिण्याच्या पाण्याची टंचाई होती आज त्याच गावांमध्ये वन हक्क प्राप्त गाव मध्ये तीस एकर जागेवर पंधरा हजार फळझाडांची लागवड करून एक सुंदर फळबाग निर्माण केलेली आहे त्याच्या माध्यमातून गावातील नागरिकांना वर्षभर रोजगार उपलब्ध केला जातो. सरपंच चंद्रकला मेश्राम यांच्या कार्यामुळे ज्या गावाला आधी कोणी ओळखत नव्हतं असे हे लाखापुर गाव सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला आहे.

प्रतिक्रिया...

1) आमच्या गावामधे आधी खूप पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मी सरपंच झाल्यानंतर सर्वात पहिले मी गावाला पिण्याच्या पाण्याच्या टंचाई पासून मुक्त करण्याचे ठरविले. हर घर नळ जल योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक कुटुंबाला पाण्याच्या नळाने जोडून मी गावाला पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केली. माझ्या कार्याची दखल घेत केंद्र शासनाच्या वतीने जो सत्कार होत आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. या सन्मानामुळे आमचा आत्मविश्वास वाढला असून अजून काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. 

चंद्रकला मेश्राम
सरपंच, लाखापुर 


२) प्रतिक्रिया...

गावामधे प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सोय झाल्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला खूप आनंद झाला होताच. त्यातच केंद्र शासनाच्या वतीने आमच्या गावाचा जो सन्मान होत आहे. याचा आम्हाला खूप आनंद आहे. 
2015 मधे मी सरपंच असताना या योजनेला सुरुवात झाली होती. आज सन्मान होत आहे त्याने मी खूप आनंदी आहे. या सुंदर कामाचा पाया ठेवण्याचे कार्य मी केल्याचा मला अभिमान आहे.

विनोद हरिजी राऊत
माजी सरपंच, ग्रा. पं. लाखापुर

३) प्रतिक्रिया...

ज्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. त्या गावाला पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय झाल्यामुळे आमचे जीवन खूप आनंदी झाले. त्यातच गावाचा केंद्र शासनाच्या वतीने जो सन्मान होत आहे त्याचा मी गावचा नागरिक म्हणून खूप आनंद होतो आहे.

श्रावण विठोबा ठाकरे

0/Post a Comment/Comments