आष्टीचे पोलिस बनले अनाथ बहिणींसाठी आधार




आई-वडिलांचे छत्र बालपणी हरपले : तीन वर्षांपासून उचलत आहेत शिक्षणाचा खर्च


आष्टी : आई-वडील दोघेही लहानपणी मरण पावल्यानंतर अनाथ झालेल्या दोघी बहिणींच्या मदतीला देवदूत बनून आष्टीचे पोलिस स्टेशनचे ठाणेदार धावून आले आहेत. त्यांनी या दोन्ही बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.

आष्टी येथील दौलत बारसागडे हे आपल्या पत्नीसोबत राहात होते. त्यांना प्रिन्सी व खुशी या दोन मुली होत्या. घरची परिस्थिती जेमतेम होती. अशा परिस्थितीत त्यांचे कुटुंब आनंदाने राहात होते. पुढे दौलत बारसागडे यांना कॅन्सरसारख्या भयंकर आजाराने
ग्रासले आणि २०१६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबाचा आधार गेल्यानंतर खचून न जाता प्रिन्सी व खुशीची आई मुलींना घेऊन राहात होती. दुचाकीने जात असताना प्रिन्सीच्या आईचाही २०२० मध्ये अपघाती मृत्यू झाला.

आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रिन्सी व खुशी या दोघी बहिणी अनाथ झाल्या. त्यावेळेस प्रिन्सी ही सातवी व खुशी ही चौथीमध्ये शिकत होत्या. या दोघी बहिणी आष्टी येथे त्यांच्या आजीसोबत किरायाच्या घरात राहात होत्या. आर्थिक मदतीसाठी तिच्या आजीने आष्टी येथील तत्कालीन पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांची भेट घेतली. पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि त्यांनी या दोन्ही बहिणींना आर्थिक मदत केली. शिवाय या दोन्ही बहिणींचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च त्यांनी उचलला. त्यानंतर ही जबाबदारी पोलिस उपनिरिक्षक वैशाली कांबळे यांनी उचलली.

आज प्रिन्सी ही दहावी तर खुशी ही सातवीमध्ये शिशू मंदिर पब्लिक स्कूल आष्टी येथे शिक्षण घेत आहे. पुढेही या दोघी बहिणींना आर्थिक मदत करीत राहणार असे पोलिस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांनी गडचिरोली वार्ता न्युजला सांगितले

पीएसआय वैशाली कांबळेनी उचलले पालकत्व

२०२० मध्ये ठाणेदार निर्मल यांची बदली झाली. त्यानंतर त्यांनी या दोघींच्या शिक्षणाची जबाबदारी पीएसआय वैशाली कांबळे यांच्यावर सोपविली. तीन वर्षांपासून वैशाली कांबळे या दोघी बहिणींचा शिक्षणाचा खर्च करीत आहेत. कांबळे या दीड वर्षे मॅटरनिटी लिव्हवर असतानाही त्यांनी आर्थिक मदत केली.

0/Post a Comment/Comments