दवंडी येथील हत्याकांडाचा गुन्हा गडचिरोली पोलीस दलाने केला उघड



जितेंद्र सहारे तालुका प्रतिनिधी कोरची

पत्नीनेच केली प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीची हत्या. गुन्ह्यातील तीनही आरोपी पोलीसांच्या ताब्यात.

दिनांक ११/१०/२०२३ रोजी पोमके बेडगाव पासून ६ कि. मी. अंतरावर असलेल्या दवंडी या गावी राहणारा किराणा दुकानदार लखन सुन्हेर सोनार वय ३८ वर्ष, याची अनोळखी ५ ते ६ काळे कपडे परिधान केलेल्या इसमांनी घरात घुसून त्याच्या पत्नी समोर धारदार शस्त्राने हत्या केल्याची तक्रार पोलीस मदत केंद्र, बेडगाव येथे प्राप्त झाली.

प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस स्टेशन कोरची येथे अप क्र. ९९/२०२३ कलम ३०२, ३४ भादवी अन्वये दिनांक १२/१०/२०२३ रोजीचे २१:२५ वा. अज्ञात आरोपीतांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन कोरची येथील पोलीस निरिक्षक फडतरे व पोमकें बेडगावचे प्रभारी पोउपनि विठ्ठल सूर्यवंशी यांनी गोपनीय यंत्रणा तयार करून सतर्क करत गावातील रहिवासी, नातेवाईक यांचेकडे सखोल चौकशी केली असता, मयताची पत्नी नामे सरिता लखन सोनार रा. दवंडी हीचे दवंडी येथील सुभाष हरिराम नंदेश्वर या इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पती नामे लखन यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवत मयताच्या पत्नीकडे अधिक विचारपुस करण्यात आली. सुरुवातीला तिच्याकडुन उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

मय्यत लखन हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी भांडण करत होता व तिचा शारीरिक मानसिक छळ करीता होता. या त्रासाला कंटाळुन आरोपी मय्यताची पत्नी सरिता हिने तिचा प्रियकर नामे सुभाष नंदेश्वर याला सर्व हकिकत सांगत पतीचा काटा काढावा या करीता तगादा लावला. त्यावर दिनांक ९/१०/२०२३ रोजी लखन सोनार याच्या हत्येचा कट रचुन हत्येची जबाबदारी बळीराम गावडे रा. कुकडेल यांचेकडे देण्यात आली. नियोजीत दि. ११/१०/२०२३ चे रात्री अंदाजे १०.४५ वा. मारेकरी बळीराम गावडे याने मय्यताची पत्नी सरिता हिच्या मदतीने घरात प्रवेश केला व धारदार शस्त्राने लखन सोनार याची निर्घृण हत्या करुन निघुन गेला. सदर घटनेतील सर्व कबुली मयताची पत्नी सरिता हिने दिलेली असुन गुन्ह्यातील सर्व आरोपी नामे १) सरिता लखन सोनार, २) सुभाष हरिराम नंदेश्वर दोघेही रा. दवंडी व ३) बळीराम गावडे रा. कुकडेल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर घटनेचा पुढील तपास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहील झरकर सा. यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र, बेडगाव चे प्रभारी अधिकारी पोउपनि विठ्ठल सूर्यवंशी हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments