नितीश कुमार : 'त्या' वक्तव्याचा अन्वयार्थ प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा

Gadchirollivartanews, editor Bhaskar Farkade
नितीश कुमार : 'त्या' वक्तव्याचा अन्वयार्थ

प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणासाठी महिला शिक्षणाची गरज अधोरेखित करताना वादग्रस्त विधान केले. विरोधकांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. या विधानामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी आता माफी मागितली आहे. असे असले तरी विरोधक नितीश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहेत.

नितीश कुमार नेमके काय म्हणाले?

बिहार सरकारने जात सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालावर बोलताना ते महिला शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यावर बोलत होते. बिहारचा लोकसंख्या वाढीचा दर ४.२ टक्क्यांवरून २.९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. याच विषयावर भाष्य करताना नितीश कुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठीच्या पद्धतीचे तपशीलवार वर्णन केले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहातील आमदारांमध्ये हशा पिकला. मात्र, या विधानावर भाजपाच्या काही महिला आमदारांनी आक्षेप घेतला.मात्र नितीश कुमार यांच्या त्या विधानाचा अन्वयार्थ समजून घेण्याची गरज आहे. भारतात कोणत्याही गोष्टीचं राजकारण होत असते.राजकारण व्हावं पण त्यातील वास्तव देखील समजून घेतले पाहिजे. नितीश कुमार यांनी भर विधान सभेत एका महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलले..लोकसंख्या वाढ कशी रोखता येईल,शिक्षण आणि लोकसंख्या याचा प्रजनन दराशी संबंध कसा आहे.शिक्षणाने प्रजनन दर कसा कमी करता येईल हेच ते समजावून सांगत होते,मात्र विरोधकांनी हल्लाबोल करत गोंधळ घातला आणि त्यांचे ते वक्तव्य राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा झाला.

नितीश कुमार यांना
लोकसंख्या नियंत्रणाबाबत बोलायचे होते तेच ते बोलले. जर महिला शिक्षित असतील तर प्रजनन दर खात्रीशीररित्या कमी होईल. त्यांचा एवढाच मुद्दा होता.
सुशिक्षित पत्नी प्रेग्नंसीची शक्यता टाळते आणि त्यामुळे बर्थ रेट किंवा जन्मदर घटला आहे असं मुख्यमंत्र्यांच म्हणण होतं. याबाबत त्यांनी खुलासाही केला आहे. याशिवाय माझ्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो असं म्हणून त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

देशातील वाढती लोकसंख्या पाहता लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी दररोज होत आहे. परंतु राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार देशातील प्रजनन दर कमी झाला आहे. जाहीर झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS) नुसार, भारताचा एकूण प्रजनन दर २.२ वरून २ टक्क्यांवर घसरला आहे. शहरांमध्ये प्रजनन दर १.६टक्के, तर खेड्यांमध्ये २.१ टक्के आहे. असेच चालू राहिल्यास येत्या काही वर्षात देशाची लोकसंख्या कमी होण्याची शक्यता आहे. तथापि, अजूनही काही राज्ये आहेत जिथे प्रजनन दर जास्त आहे. त्यात हिंदी भाषिक राज्यांची संख्या अधिक आहे. जर आपण ५ सर्वाधिक प्रजनन दर असलेल्या राज्यांवर नजर टाकली तर बिहार पहिल्या क्रमांकावर आहे आणि येथील प्रजनन दर ३आहे. मात्र, येथेही घट झाली आहे.

१९९२-९३ साली बिहारच प्रजनन दर ४ होता. ही सगळी आकडेवारी २०१९-२१ च्या पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून घेण्यात आली आहे. याच आकडेवारीचा आधार घेऊन नितीश कुमारांनी विधानसभेत हे वक्तव्य केलंय. आम्ही महिलांना शिक्षण दिल्यामुळे प्रजनन दरात घट झाली आहे असा दावा नितीश कुमारांनी केला आहे.

१९५१ मध्ये, भारताचा एकूण प्रजनन दर सुमारे ६ होता जो आता २ आहे. पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात हे स्पष्टपणे दिसून आलं आहे की, ज्या भागात स्त्रिया शिक्षित आहेत तिथं त्यांना कमी मुलं होतात. यासोबतच सरकारच्या कुटुंब कल्याणाशी निगडीत विविध योजनांचा यात महत्त्वाचा वाटा आहे. ‘भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशातील हिंदू कुटुंबांमध्ये प्रजनन दर २.२९ आहे. तेच तामिळनाडूमध्ये मुस्लिम महिलांसाठी हाच दर १.९३ आहे. त्यामुळे हा दर धर्माऐवजी शिक्षण आणि आर्थिक कारणांशी जोडला पाहिजे. कारण जिथं स्त्रिया शिक्षित आहेत तिथं त्या कमी मुलांना जन्म देतात.’ असं पूनम मुतरेजा याचं म्हणणं आहे.बिहारची साक्षरतेची आकडेवारी पहिली तर बिहारमध्ये साक्षरतेचा दर ६१ टक्के आहे. त्यात पुरुष साक्षरता ७१.२० टक्के आहे तर स्त्री साक्षरता ५१.५० टक्के. २००१ च्या जनगणनेची आकडेवारी पहिली तर हाच दार फक्त ४७ टक्के होता. ज्यामध्ये पुरुष ५९.६८ टक्के तर स्त्रीया ३३.१२ टक्के साक्षर होत्या. त्यामुळे २० वर्षात ३३ वरून ५१ टक्के अशी १८ टक्क्यांची मजल चांगली असली तरी ती देशाच्या आणि इतर राज्यांच्या तुलनेत चांगली नाही.यावरून बिहारला अजून बरीच मजल मारायची आहे, हे स्पष्ट होतं. परंतु मागील काही काळात स्त्री साक्षरतेत झालेली वाढ बिहारमध्ये प्रजनन दर कमी करण्यासाठी थेट कारणीभूत आहे असं अनेक तज्ञांच म्हणण आहे. महिलांमध्ये साक्षरतेच प्रमाण वाढल्याने बिहारमध्ये गर्भनिरोधक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गर्भनिरोधक साधनं वापरण्यात बिहार टॉप तीन राज्यांमध्ये आहे. याशिवाय दोन पाल्यानंतर नसबंदीच्या शस्त्रक्रियांमध्येही वाढ झाली आहे.परंतु मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे हा मुद्दा मांडला त्यामुळे मूळ मुद्दा सोडून इतरच गोष्टींचीच चर्चा अधिक होऊ लागली. 

९५६१५९४३०६

0/Post a Comment/Comments