जिल्हा परिषद शाळेत भरले भाषेचे प्रदर्शन


जिल्हा परिषद शाळेत भरले भाषेचे प्रदर्शन

धानोरा तालुक्यातील पेंढरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये भाषा विषयाचे प्रदर्शन दिनांक 12 फेब्रुवारी ला रोंडवाही तर दिनांक 13 फेब्रुवारी ला मोहगाव येथे भरवण्यात आले होते. 
        दोन्ही शाळेमध्ये प्रदर्शनीचे आयोजन सिखे फाउंडेशन मुंबई, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त माध्यमाने सुरू असलेल्या TIP ( Teacher Innovetor Programm) या उपक्रमाच्या माध्यमातून सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये भाषे विषयी गोडी निर्माण व्हावी, भाषेची शब्दसंपत्ती वाढावी, विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यास संधी मिळावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांना, कल्पनांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांना भाषा विषय शिकताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, विद्यार्थी बोलके व्हावे इत्यादी उद्देश साध्य करण्यासाठी सदर TIP उपक्रम मागील 3 वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी शिक्षकांना ऑगस्ट 2023 ला आणि जानेवारी 2024 ला दोन दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये दिलेल्या प्रशिक्षणाचे माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत उपक्रम राबविण्यात आले. वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गोष्टी, कथा, लिहिलेल्या गोष्टी चे मुखपृष्ठ-मलपृष्ठ तयार करणे, चित्रावरून गोष्ट तयार करणे, गोष्टीवरून त्यामधील पात्रांचे चित्रण करणे, विविध चित्रे पाहून त्यावरून गोष्ट तयार करणे, मराठी भाषेची शब्दभिंत तयार करणे, स्वतः तयार केलेल्या गोष्टीचे सादरीकरण करणे असे इत्यादी कार्य विद्यार्थ्यांना स्वतः करता यावेत याकरिता शाळास्तरावर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहेत. प्रदर्शनी सुरू करण्यापूर्वी प्रभात फेरी काढून गावातील सर्व नागरिकांना, पालकांना शाळेतील प्रदर्शनी पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
  याच माध्यमातून रोंडवाही आणि मोहगाव, पावेटोला या शाळेमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनीला दोन्ही शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच पालक वर्ग उपस्थित झालेला होता. तसेच केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मंसाराम मेश्राम, सिखे जिल्हा समन्वयक संदीप पाटील, रोंडवाही शाळेचे मुख्याध्यापक बंडू सातपुते, सहायक शिक्षक भाऊराव मडावी तसेच मोहगाव शाळेचे मुख्याध्यापिका वनिता चौधरी, सहायक शिक्षिका रुशवंती धुर्वे, तसेच पावेटोला शाळेचे शिक्षक रवींद्र गंडाटे उपस्थित होते. 
  प्रदर्शनी यशस्वी करण्याकरिता दोन्ही शाळेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच सिखेचे मार्गदर्शक धनराज कोहळे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. 
   सदर प्रदर्शनी मध्ये विद्यार्थी आपल्या पालकांना, समिती सदस्यांना तसेच प्रदर्शनी पाहायला आलेल्या सर्व नागरिकांना स्वतः तयार केलेल्या कार्याची माहिती देत होते. प्रामुख्याने मोहगाव येथे झालेल्या प्रदर्शनीला महिला वर्गाची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. प्रत्येक विद्यार्थी आपले विचार, भावना बोलून दाखविण्याचा प्रयत्न करत होते.

0/Post a Comment/Comments