बहुविध क्षेत्रात कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे : प्राचार्य शैलेंद्र खराती सर प्रा. डॉ .राजकुमार मुसणे


बहुविध क्षेत्रात कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे : प्राचार्य शैलेंद्र खराती सर
प्रा. डॉ .राजकुमार मुसणे 

एखादा सामान्य व्यक्ती आपल्या स्वतःच्या जीवनाच्या विकासाबरोबरच परिसरातील जीवनमान उंचावण्यासाठी धडपडतो. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ,सांस्कृतिक, संस्थात्मक,धार्मिक, कृषी विषयक व क्रीडा क्षेत्रात कर्तुत्वाची मोहोर उमटवत सामाजिक बांधिलकी जोपासतो. अध्ययन, अध्यापन आणि व्यवस्थापनाबरोबरच सामाजिक विकासासाठी धडपडतो,असे बहुविध क्षेत्रात कार्य करून कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे व्यक्तीमत्त्व म्हणजेच प्राचार्य शैलेंद्र खराती सर होय.

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे माननीय शैलेंद्र खराती सर एकूण ३७ वर्षे ,सहा महिने, पाच दिवसांची सेवा करीत सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवाकाळ एकूणच धडपड,तडजोड, योग्य नियोजन, परिश्रमपूर्वक अंमलबजावणी यामुळे वैशिष्ट्यपूर्ण राहिला.
सुरुवात बिकट व हलाखीच्या स्वरूपात झाली . कौटुंबिक व आर्थिक अडचणींचा सामना करीत ध्येयवादत्वाने व निष्ठेने शिक्षण पूर्ण केले. समाज बदलण्यासाठी, मागासले पण दूर करण्यासाठी शैक्षणिक क्रांती होणं गरजेचे आहे, हे ओळखून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचे ठरविले. प्रारंभी शिक्षक, मग मुख्याध्यापक नंतर प्राचार्य अशा विविध भूमिका परिश्रमपूर्वक निभावत आपली कारकीर्द यशस्वी केली. कष्ट करण्याची शक्ती, गुणग्राहकता, योग्य नियोजन , संघटन कौशल्य व दूरदृष्टीच्या बळावर विविध क्षेत्रात लीलया संचार केला.


 धडपडशीलवृत्ती असलेल्या खराती सरांनी वेगवेगळ्या जाती -समूहातील विद्यार्थ्यांना शाळेकडे आकृष्ट करण्यासाठी परिश्रम घेतले. विद्यार्थी प्रमाणेच पालकांना भेटून, पालकांना शाळेविषयी आस्था निर्माण करण्यात त्यांना जे यश मिळाले ते वाखाण्यासारखेच.प्रारंभी ९२ विद्यार्थ्यापासून सुरू झालेल्या शाळेत १२०० विद्यार्थी संख्या वाढविण्यात व शाळेतून अनेक विद्यार्थी घडविण्यात त्यांचा हातभार महत्त्वाचा ठरला.
ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात सुधारणा व्हावी, ग्रामीण भागातील उपेक्षित, दुर्लक्षित विद्यार्थी शाळेत यावेत. त्यांना शाळेत आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करणे आणि उच्चशिक्षित गुणवत्तावाण दर्जेदार शिक्षकाची नेमणूक करून शाळेत पोषक शैक्षणिक वातावरण निर्माण करणे, यासाठी ते नेहमी प्रयत्नरत राहिले.


१ मार्च १९६६ ला माता सरस्वती व पिता महेंद्रजी यांच्या पोटी जन्माला आलेले चौथे अपत्य म्हणजेच शैलेंद्र होय. खरे तर खराती परिवार हा मूळचा बांगलादेशातील तपलवाडी जिल्हा खुलना येथील .त्यांना सम्मंदर या बिरूदाने उल्लेखले जायचे . धार्मिक द्वेष भावनेतून बांगलादेशात अराजकता सुरू झाली असता दंगलीला कंटाळून इंदिरा गांधींच्या हाकेला ओ देत बराचसा बंगाली समाज १९६४ मध्ये गडचिरोलीत दाखल झाला. अन्य बंगाली समाजाप्रमाणेच खराती परिवारास कांचनपूर तालुका मुलचेरा येथे आश्रय मिळाला.

शैलेंद्र खराती यांनी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळा कांचनपूर येथे घेतले. पाचवी ते सातवीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा लगाम येथे पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण घोट येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी शाळेत शिक्षण पूर्ण केले.महाविद्यालय शिक्षणाकरिता शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली आणि कर्मयोगी बाबा आमटे यांनी वरोरा येथे सुरू केलेल्या महारोगी सेवा समितीच्या आनंदनिकेतन महाविद्यालयात त्यांनी अकरावी करिता प्रवेश घेतला आणि तिथूनच १९८६ ला गणित विषयातील बी.एस्सी. ची पदवी घेऊन ते उत्तीर्ण झाले.
खरे तर तत्कालीन कौटुंबिक, आर्थिक,सामाजिक परिस्थिती भयावह स्वरूपाची होती. खडतर पायवाटेने त्यांना मार्गक्रमण करावे लागले आहे.
' सफलता हाथो की लकीरे मे नही माथे के पसीने में होती है' हे कृतीतून साकारणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे खराते सर. प्रतिकूलतेही हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत मोठ्या परिवारात दारिद्र्याचे चटके सहन करीत पदवीधर होणारे परिवारातील ते पहिले ठरले. 
'याचसाठी शिक्षण घेणे की जीवन जगता यावे सुंदरपणे' या उक्ती प्रमाणे मुळातच शिक्षणाची आवड असल्यामुळे पुढे शिक्षणाचा ध्यास व परिश्रमाच्या प्रयासाने त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून १९९६ मध्ये एम. ए. समाजशास्त्र या विषयात शिक्षण पूर्ण केले.
प्राचार्य शैलेंद्र खराती सर यांचे व्यक्तिमत्व उत्तुंग स्वरूपाचे आहे. देखणे , धीरगंभीर ,संघर्षशील, महत्त्वकांक्षी असे अनेक व्यक्तिमत्त्वाचे विशेष पैलू प्रामुख्याने जाणवतात.
 साधारण उंची सहा फूट असलेलं हे भारदस्त व्यक्तिमत्वाचे सव्यसाचित्व सर्वश्रूत आहे.

शिक्षणाबरोबरच आपल्याकडे ज्ञानाचा समाजातील निरक्षरांना लाभ व्हावा, आपल्या परिसरातील विद्यार्थी सुसंस्कृत व्हावेत ,याकरिता राजे धर्मराव हायस्कूल लगाम येथे २४ ऑगस्ट १९८६ ला ते शिक्षक म्हणून नोकरीवर रुजू झाले. पुढे मुख्याध्यापकाचा कार्यभारही त्यांच्याकडेच संस्थेने सोपविला. तिथे २५ सप्टेंबर १९८८ पर्यंत शैक्षणिक कारकीर्द पूर्ण करून २६ सप्टेंबर १९८८ ला वन वैभव शिक्षण मंडळाची पहिली शाळा नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल सुंदरनगर येथे ते प्रभारी मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे पुढे कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले. वन वैभव शिक्षण मंडळाचे संस्थापक सचिव माननीय अब्दुल हकीम साहेब व कोषाध्यक्ष माननीय चाच्चमाजी हकीम यांचे योग्य मार्गदर्शनामुळे सुंदरनगर येथील शाळेत त्यांनी राबविलेल्या विविध योजना , सहकाऱ्यांचे परिश्रम आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या विविध प्रयोगशीलतेमुळे वन वैभव शिक्षण मंडळाची ही शाळा अल्पावधीतच नावारूपास आली.
सन १९९४ मध्ये सुंदरनगर येथील कु.संगीता यांच्याशी त्यांनी विवाह केला. पुढे संगीता यांना शिक्षणास प्रवृत्त करून शिक्षिका बनविण्यासाठी मदत केली. त्यांना तीन अपत्य असून कु.शीला या वनस्पतीशास्त्रात एम. एस्सी .असून संशोधन कार्य करीत आहेत. कु. शिवाणी हिने बी.डी.एस.चे ( दंत चिकित्सक) शिक्षण पूर्ण केले आहे. तर चि. सागर हा बीसीए उत्तीर्ण झालेला आहे.


         सुंदरनगर येथून ते महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी येथे २००८ मध्ये आले. पुन्हा २०१९ मध्ये सुंदरनगरला त्यांचे स्थलांतरण झाले. पुन्हा ते आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात 2022 ला आले आणि याच शाळेतून ते सेवानिवृत्त होत आहेत. एकूण ३७ वर्ष ,सहा महिने, पाच दिवसाची सेवा शिक्षण क्षेत्रात देत वेगवेगळ्या कार्याने आपल्या कर्तुत्वाची चुणूक प्राचार्य शैलेंद्र खराती यांनी दाखविलेली आहे. 
ज्ञानगंगा घरोघरी या ध्यासाने झपाटलेल्या माननीय हकीम साहेबांनी वनवैभव शिक्षण मंडळाच्या माध्यमातून खेडेभागामध्ये, आडवळणाच्या गावात, शैक्षणिक मागासलेपण असलेल्या ठिकाणी ,दुर्गम क्षेत्रात शाळा सुरू करणे, दुर्लक्षित, उपेक्षितांना शिक्षण देणे व गुणवत्तावान होतकरूंना सेवेत घेऊन अध्यापनाची संधी देणे, हे धोरण अवलंबलेले होते. त्यामुळे चांगल्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचे स्वातंत्र्य प्राचार्य शैलेंद्र खराती यांना दिल्यामुळे आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा या नामांकित शिक्षण क्षेत्रातून शिक्षण घेतलेल्याना वन वैभव शिक्षण मंडळाच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये संधी मिळाली. प्राचार्य गजानन लोनबोले, डॉ.श्रीराम महाकाळकर,प्राचार्य प्रकाश दुधभावरे ,प्राचार्य विठ्ठल निखुले यासारखे अनेक कर्तृत्ववान तरुणांनी विलक्षण कार्य करीत आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. आदिवासी भागात पीएच.डी. करण्यासाठी डॉ. श्रीराम महाकाळकर यांना प्रवृत्त करून आचार्य ही सर्वोच्च पदवी मिळविण्यासाठी प्रोत्साहित करण्यात मा.शैलेंद्र खराती सरांचे योगदानही महत्त्वपूर्ण आहे.

वन वैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष माननीय बबलूभैया हकीम सर व सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभागीय महिला अध्यक्ष मां.शाहीन भाभीजी हकीम यांचे सहकार्य व मार्गदर्शन यामुळे विविध क्षेत्रात कार्य करण्यास प्रेरित झाले.सामाजिक बांधिलकी जोपासत बंगाली समाजाच्या विविध कामांना प्राधान्य देऊन दुर्लक्षित समाजाला समाजप्रवाहात आणण्यासाठी शैलेंद्र खराती यांनी केलेले कार्य ही वाखाण्यासारखे आहे .विशेषतः बंगाली भाषिक मुलांना प्राथमिक शिक्षण बंगाली भाषेतून मिळाले पाहिजे, यासाठी पूर्ण प्रयत्न करून जवळपास ४८ जिल्हा परिषदच्या प्राथमिक बंगाली शाळा निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून एक जानेवारी २००४ ते ११ फेब्रुवारी ,२००४ पर्यंत एकूण ४२ दिवस बंगाली भाषिक असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा आंदोलनही त्यांनी यशस्वी करून दाखविले. बंगाली भाषिकांना त्यांच्या मूळ जातीचे पूर्ववत प्रमाणपत्र मिळावें ,प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून मिळावे, अपूर्ण राहिलेला चेन्ना सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावा आणि अतिक्रमिकांना जमिनीचे पट्टे मिळावेत .यासाठी शैलेंद्र खराती सर वेगवेगळ्या माध्यमातून पुढाकार घेत विविध मंत्री याना पत्र व्यवहाराने सामाजिक कार्य करीत असतात. अशा समाज उपयोगी विविध कार्यामुळे सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे समूहप्रिय व्यक्तिमत्व म्हणून खराती सर ओळखले जातात.
प्राचार्य शैलेंद्र खराती सरांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजनही करण्यात आलेले आहे.प्रामुख्याने २१ वी २५ वी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले होते. सातत्याने २१ वर्षापासून दरवर्षी आष्टी येथे मतुआ धर्मीयांचे महासम्मेलनाचे आयोजन ते करतात. त्यातून मुलांना योग्य शिक्षण देत संस्कारित करणे, आई-वडिलांचा सन्मान करणे, नवीन पिढीवर संस्कार करून त्यांना योग्य वळण लावण्याकरिता अशा मेळाव्यांचे यशस्वी आयोजन त्यांनी केलेले आहे.
  सामाजिक कार्याबरोबरच त्यांचे क्रीडा क्षेत्रातले कार्य ही उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन त्यांनी करून खेळायला महत्व दिले आहे. त्यांच्या कार्यकाळात शालेय जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन आष्टी येथे करण्यात आले होते. अनुष्का कैलास वाळके व मनस्वी बामनकर या विद्यार्थ्यांना प्राचार्य शैलेंद्र खराती यांच्या नेतृत्त्वात प्रा . डॉ.श्याम कोरडे व सुशील अवसरमोल यांच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्रीय पदक प्राप्त झाले. तसेच एकूण २७ विविध खेळाडूंना राज्यस्तरावर धनुर्विद्या व अन्य खेळात पदक प्राप्त झाले आहे. विशेषत्वाने उल्लेखनीय कुमारी श्वेता भास्कर कोवे या दिव्यांग विद्यार्थिनींना धनुर्विद्या या खेळात डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंज तुघलताबाद येथील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पदक मिळाले. अर्थातच खेळाडूंना प्रोत्साहन देणे, त्यांना योग्य प्रशिक्षणासाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. शारीरिक तंदुरुस्तीसाठी ते नेहमी सकाळी योगनृत्य करतात.
आरोग्य विभाग अंतर्गत रक्त संकलन केंद्रातर्फे प्राचार्य शैलेंद्र खराती यांना पुरस्कृतही करण्यात आले आहे. आई-वडिलावर प्रचंड श्रद्धा असणारे, त्यांची निस्सीम भावनेने सेवा करणारे , स्नेहसमत्वाने संपूर्ण खराती परिवारावर प्रेम करीत सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करणारे , संकट प्रसंगी विविध लोकांना हातभार लावणारे दातृत्वशील व्यक्तिमत्व म्हणजे खराती सर.

शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या भागातील युवकांना बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे ,यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा . बंगाली भागातील शाळांचा व शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या बंगाली भाषिक शाळांमध्ये ११९ बंगाली युवकांना नोकरी मिळालेली आहे. तर इतर विविध ठिकाणी २०० पेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे. डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे कार्यरत असलेले प्रा.डॉ.नारायण दास ,विदेशातील वैज्ञानिक माधव शील ,ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. देवरी यासारखे असंख्य विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत आहेत.

शैलेंद्र खराती सरांना चार भाऊ आणि दोन बहिणी त्यातल्या चौथ्या क्रमांकाचे शैलेंद्र सर. त्यांना बंगाली, हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व . मुळातच कुशाग्र बुद्धिमत्ता , समन्वयशीलता, प्रसन्न मुद्रा,सातत्याने धडपड करण्याची वृत्ती, प्रतिकूलतेला अनुकुलतेत रूपांतर करून यशस्वी होण्याच्या विजीगीषू प्रवृत्तीमुळे त्यांनी मुलचेरा तालुक्यातच नव्हे तर गडचिरोली जिल्ह्यात आपले वेगळे वलय निर्माण केले.

विविध समित्यावर प्राचार्य शैलेंद्र खराती यांनी कार्य केले आहे. राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटविलेला आहे. काँग्रेसचे जिल्हा सचिव ,मुलचेरा पंचायत समितीचे २००० ते २००४ दरम्यान सदस्य होते. सेवा सहकारी संस्था शांतीग्राम या सोसायटीचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.आर. आर.पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे सुंदरनगर येथे ते २००७ या स्थापनेपासून ते आज पर्यंत अध्यक्ष आहेत .स्थापनेपासून अद्यापपर्यंत एकमेव अध्यक्ष राहिलेले कदाचित हे एकमेव उदाहरण असेल. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून केलेल्या कार्यामुळे सात लाखाचा निधी उपलब्ध झाला आणि त्यातून सुंदर नगर ,भगतनगर, खुदीरामपल्ली, भवानीपुर ,तरुणनगर, श्रीनगर या गावांमधील मुख्य प्रवेशद्वार बनविण्यात आले आहे. गावातील किरकोळ वाद संपुष्टात आणणे, तंटे सोडविणे, सलोखा प्रस्थापित करण्यात प्राचार्य शैलेंद्र खराती यांना यश मिळाले आहे.
प्राचार्य शैलेंद्र खराती यांनी शिक्षण क्षेत्राबरोबर इतर सामाजिक क्षेत्रातील कार्यही जबाबदारीने केले आहेत. चेन्ना सिंचन प्रकल्प कृती समितीचे संयोजक, निखिल भारत बंगाली समन्वय समितीचे राष्ट्रीय सदस्य ,महाराष्ट्र मतुआ महासंघाचे सचिव या विविध पदांवर निरपेक्ष वृत्तीने सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य केले आहे. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक संघाचे माजी मुलचेरा तालुकाध्यक्ष, काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव, पंचायत समितीचे माजी सदस्य, सेवा सहकारी संस्था शांतीग्रामचे अध्यक्ष अशा विविध ठिकाणी कामे केली आहेत.
विद्यार्थी प्रिय, शिक्षण क्षेत्रात उपक्रमशीलता ठेवणारे,
नवीनतेचा ध्यास बाळगणारे, सामाजिक बांधिलकी जोपासणारे,
सामाजिक कार्यकर्ते ,
सातत्याने कल्पक बदल स्वीकारणारे, आव्हानांना समर्थपणे तोंड देत विधायक कार्यात निरंतर व्यस्त असे हे कुशल ,कल्पक, उत्कृष्ट व्यवस्थापक ,सामाजिक दायित्व निभावणारे आपले सेवा कार्य निष्ठने चालू ठेवणारे एक कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्व म्हणजेच खराती सर होय
आज ते शैक्षणिक सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. परंतु 
'
न शिकायत हे थकाण की न गिला मेहनत का जिम्मेदारी मुझे बुड्ढा नही होने देती' 
हे त्यांच्या बाबतीत खरे ठरेल .चार भिंतीच्या शाळेबाहेरील मुक्त सामाजिक शाळेत मात्र ते निरंतर कार्य करतीलच.त्यांच्या यशस्वी सेवा पूर्ती बद्दल हार्दिक अभिनंदन..!
 पुढील आयुष्य सुखा- समाधानाचे जावो. त्यांचे आरोग्य सुदृढ राहो आणि उतरो त्तर सामाजिक सेवा अधिक्याने घडो, हीच सदिच्छा....

प्रा. डॉ. राजकुमार मुसने

0/Post a Comment/Comments