झाडीपट्टी रंगभूमीची झेप


झाडीपट्टी रंगभूमीची झेप


प्रा. डॉ. राजकुमार मुसणे,
आष्टी, जि.गडचिरोली
९४२३६३९५३२

प्रस्तावना : 
 'महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात येथील लोकसंस्कृती व जीवन वास्तवाचे प्रतिबिंब बोली भाषेतून प्रकट करणारी लोकाश्रयावर आधारलेली रंजन व प्रबोधनाची लोक चळवळ म्हणजेच झाडीपट्टी रंगभूमी .'नाट्य वेडे ,संगीतप्रेमी, कलासक्त रसिक जनतेमुळे झाडीपट्टीत दिवाळी ते होळी दरम्यान घरोघरी पाहुण्यांची वर्दळ ,गावोगावी नाटकांचा माहोलच असतो. पूर्व विदर्भातील या जिल्हयाबरोबर यवतमाळ, नागपूर ,मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणाच्या सीमावर्ती भागात झाडीपट्टी नाटकाचे प्रयोग होतात. नवरगाव जि.चंद्रपूर येथील श्री व्यंकटेश नाटय मंडळ सन १८८७ ते आज पर्यंत एकूण १३७ वर्षाची समृद्ध परंपरा झाडीपट्टी रंगभूमीला लाभलेली आहे. दंडार, खडीगंमत सारख्या लोकनाट्यापासून उत्क्रांत झालेल्या झाडीपट्टी रंगभूमीने पौराणिक,सामाजिक, ऐतिहासिक,कौटुंबिक ,ज्वलंत विषयावरील विविधांगी नाटकातून सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करीत प्रबोधनही केले आहे. झाडीपट्टी रंगभूमीचा प्रवास हौशी रंगभूमीकडून आता व्यावसायिकतेकडे वळलेला आहे. झाडीपट्टीची नाट्यपंढरी वडसा येथे आज जवलपास ५५ नाट्य कंपन्यांचे कार्यालय स्थापित असून इथूनच नाटकांचे बुकिंग होत असतात.
दरवर्षी गावोगावी होणारे नाटके ,करोडोची उलाढाल, जनसामान्यांचे करमणूक करत लोकशिक्षणाचे धडे देणारी झाडीपट्टी रंगभूमी स्वयसिद्ध अन् श्रीमंत आहे.रसिका प्रेक्षक वर्ग आजतागायत कायम ठेवण्यात झाडीपट्टी रंगभूमीने यश मिळवले आहे. मात्र एकूण मराठी नाट्यसृष्टीने मात्र फारशी दखल घेतली नाही. सर्व प्रसार माध्यमे पुणे ,मुंबई सारख्या शहरांकडे असल्यामुळे आणि त्यांच्याच प्रभावाखाली वावरत असल्यामुळे झाडीपट्टी रंगभूमी दुर्लक्षित राहिली. पी.साईनाथ या सजग पत्रकाराने झाडीपट्टीला चांगले कव्हरेज दिले.अन् अचंबित होत अनेकांचे डोळे विस्फारले.अलीकडे मात्र काहीअंशी झाडीपट्टीची दखल घेतली जात असून विद्यापीठीय अभ्यासक्रमातही समाविष्ट आहे. मुलुंड येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनात शेखर डोंगरे यांच्या नाट्य मंडळाचे 'कसोटी कुंकवाची 'या नाटकाचा यशस्वी प्रयोग झाला. अनेक सिने कलावंतांनी भरभरून दाद दिली.सदानंद बोरकर लिखित, दिग्दर्शित 'अस्सा नवरा नको ग बाई' या नाटकाचा प्रयोग नागपूर येथील ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रेक्षकांच्या भरगच्च प्रतिसादात झाला. तद्वतच झाडीपट्टीतील व्ही.दिलीप कुमार लिखित राजेश चिटणीस दिग्दर्शित '' आक्रोश' या नाटकाचा प्रयोग नागपूर येथील अखिल भारतीय नाट्य संमेलनात करण्यात आला. त्यास प्रेक्षकांनीही चांगली पसंती दर्शविली.सदानंद बोरकर यांच्या व्यंकटेश नाट्य मंडळाच्या 'आत्महत्या ' नाटकाचा प्रयोग सार्क आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये सादर होऊन झाडीपट्टी रंगभूमीची पताका सर्वदूर उंचावलेली आहे. 
झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांचे 'स्पेशल रिपोर्ट' हे नाटक शिवाजी रंगमंदिर, मुंबई येथे १९९३ ला "प्रतिभा थिएटर्स, मुंबई या संस्थेने व्यावसायिक रंगभूमीवर सादर केले. झाडीपट्टीतील या नाटककाराचे मुंबईकडे अनेक प्रयोग झाले. झाडीचा झेंडा इतरत्र रोवल्याचे द्योतकच. स्व .दौंड व स्व.कोतपल्लीवार यांच्या संघाने उमाजी नाईक, तंट्या भिल्ल या नाटकाचे कोकणात प्रयोग केले आहेत.तद्वतच प्रयोगशील रंगकर्मी अनिरुद्ध वनकर यांच्या लोकजागृती नाट्य मंडळाच्या 'घायाळ पाखरा', मूठभर तांदूळ 'या नाटकांचे प्रयोग राष्ट्रीय महोत्सवामध्ये यशस्वीरित्या झालेले आहेत. झाडीपट्टीतील कलावंत अनिरुद्ध वनकर यांनी च दिल्ली विश्वविद्यालयात ' आदिम लोककला व रंगभूमी' या विषयावर मार्गदर्शन तसेच त्यांच्या नाटकांचे प्रयोग राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवात तथा संगीत अकादमी नाट्य महोत्सवातही झाले आहेत.चुडाराम बल्हारपुरे यांचे अनिरुद्ध वनकर यांनी दिग्दर्शित केलेले "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाचा प्रयोग "जनयोद्धा राष्ट्रीय नाट्य समारोहात" भोपाळ ( मध्यप्रदेश) येथे झाला.'घायाळ पाखरा'या नाटकाचे आजपर्यंत एकूण 553 प्रयोग, मरीमायचा भुत्या, भूक , संतान , बळी, माझं कुंकू मीच पुसलं, बहुढंगी समाधीवाले बाबा ,कसोटी कुंकवाची अशा नाटकांनी प्रयोग संख्येचा उच्चांक गाठत इतिहास रचला. चंद्रकमल थिएटरचे कसोटी कुंकवाची,सदानंद बोरकर यांचे ''असा नवरा नको ग बाई ', अनिरुद्ध वनकर यांचे 'घायाळ पाखरा' या नाटकाचे प्रयोग पुणे - मुंबईकडेही झाले.चुडारामजी बल्हारपुरे यांचे 'महामृत्युंजय मार्कंडेश्वर' हे महानाट्य ५१ कलावंत ,१५ तंत्रज्ञ व ३३ गीते यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून अजरामर ठरले.निश्चितच ही फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी ,रसिक प्रेक्षकांच्या लोकाश्रयावर टिकून असलेली बहूजनांची रंगभूमी म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी होय. झाडीपट्टीत शेकडो कलावंत आहेत. त्यातला प्रत्येक कलावंत हा सेलिब्रिटी आहे. डॉ.परशुराम खुणे, प्रा. शेखर डोंगरे, हिरालाल पेंटर, सदानंद बोरकर, के . आत्माराम, युवराज प्रधान, गोपी रंधये, युवराज गोंगले, अनिरुद्ध वनकर, देवेंद्र दोडके, नरेश गडेकर, अरविंद झाडे , संदेश आनंदे, ज्ञानेश्वरी कापगते, कीर्ती आवळे ,निशा धोंगळे, पायल , सविता भोयर,पोर्णिमा तायडे, प्रियंका गायधने अशा बहुगुणी रंगकर्मीनी झाडीपट्टी रंगभूमीचे क्षेत्र विस्तारित लखलखीत केले. अनेक कलावंत अल्पशिक्षित आहेत. नाट्याभिनयाचे प्रशिक्षण न घेता येईल केवळ अनुकरणातून अभिनय करणारे आहेत. इतर वेळी शेतीचे कामे व इतर छोट्या व्यवसायात रममाण होत सीझनमध्ये नाटकातून अभिनय करणारे आहेत.अनिरुद्ध वनकर, प्रल्हाद मेश्राम,युवराज प्रधान, युवराज गोंगले, संतोष कुमार, संतोष बारसागडे या गायकांनी तर झाडीपट्टीतील रसिकांना भुरळ पाडत चैतन्यमय वातावरण निर्मिती केली. झाडीपट्टीतील किशोर मेश्राम, दिलीप वडे सारख्या नाट्यलेखकांची 50 च्या वर नाटके त्यांच्या नावावर आहेत. गो.ना. मुनघाटे, चुडाराम बल्लारपुरे, सदानंद बोरकर , प्रेमकुमार खोब्रागडे, यश निकोडे, युवराज प्रधान, युवराज गोंगले, पंकज मडावी ते आनंद भिमटे या सकस व कसदार लेखन करणाऱ्या स्थानिक विषयांना हाताळणाऱ्या नाट्य लेखकानी फार मोठी परंपरा असून रसिकांची अभिरुची संपन्न करीत झाडीपट्टी रंगभूमी ला अजरामर नाटके दिली.खरे तर प्रसार माध्यमांच्या हिणकस वक्रदृष्टीमुळेही झाडीपट्टीतील हे रंगकर्मी म्हणावे तसे प्रकाश झोतात येऊ शकले नाहीत. मीडिया सजग नसल्यामुळे प्रचंड समृद्धी असलेली श्रीमंत झाडीवूड सर्वदूर पोहोचले नाही.
  ग्रामपंचायत असलेल्या वासेरा, कुरुड सारख्या गावात एकाच रात्री अनुक्रमे चार व सहा नाटके २०२४ मध्ये मोबाईल प्रत्येकाच्या हातात असण्याच्या मल्टी मीडियाच्या अतिवापराच्या काळात हाऊसफुल्ल चालतात. असे नाट्यप्रेमी गाव झाडीपट्टीशिवाय अन्य महाराष्ट्रात आहे काय? एवढी समृद्धता झाडीपट्टी रंगभूमीला लाभलेली आहे.
अर्थातच दरवर्षी नवीन 30 नाट्य संहिता, किमान 2500 प्रयोग, ७० करोडची वार्षिक उलाढाल, हजारोंना व रोजगार देणारी , करमणूक कराच्या माध्यमातून शासकीय तिजोरीत लाखोची भर घालणारी झाडीपट्टी रंगभूमी ही वैभवशाली रंगभूमी आहे. भारतीय रंगभूमीच्या पडत्या काळातही झाडीपट्टी रंगभूमी मात्र अग्रेसरच राएकूणच मराठी रंगभूमीत झाडीपट्टी या प्रादेशिक रंगभूमीचे स्थान अनन्यसाधारणच आहे.

      या सीझनची (२०२३-२४ ) नवीन नाटके :
दरवर्षी किमान 30 नवीन नाटके झाडीपट्टी रंगभूमीत सादर होतात. झाडीपट्टीतील स्थानिक लेखक वेगवेगळे विषय नाटकाच्या माध्यमातून हाताळत आहेत .तसे तर लिहिणाऱ्या नाट्यलेखकांची संख्या व नाटकांची संख्या अधिक आहे ;परंतु लेखकांनी लिहिलेले नाटक रंगभूमीवर सादर होऊन त्यांचे प्रयोग होत आहेत ,अशा दरवर्षी नवीन येणाऱ्या नाटकांची संख्या तीस आहे. या 2023-24 वर्षातील (नोव्हेंबर)दिवाळीपासून सुरू झालेल्या नाटकांच्या हंगामात विविध नाटय मंडळाने पुढील नाटकांचे प्रयोग केले आहेत.
रणांगण, पापी पुत्र ,पिंजरा, पेटलेल्या चुली,जानवर ,माऊली , दोन घरांचे गाव,माणूस एक माती, निराधार ,नपुसकाचे बाळ, लावारीस , छळ, खतरनाक, दगाबाज, स्पर्श काळजाचा ,भाग्यलक्ष्मी, बायको नंबर वन ,विसरू नको सौभाग्याला, दुःख एक यातना,घरदार, बायको वैरी कुंकवाची, ,वादळ ,भूक मातृत्वाची ,अन्याय, बायको बिलंदर, लेक माझी नशीबवान ,काळोख, हेच का माझे दुर्दैव , श्वास :एक डाव मृत्यूचा ,मातीत मिसळला संसार, ,जालीम ,हेच का माझे बाळ, आई तुच माझी माऊली, मायेचा हात, कलंक, रात्र पेटली काळोखाची, वीर बाबूराव शेडमाके, संसार विसरलेला माणूस, रक्ताळलेले अश्रू, नवसाचे पोर, नाते तुझे नि माझे, वाघीण, अत्याचार, खिंडार,जनावर, बांगड्या फुटल्या प्रेतावर यासारखी 30 पेक्षा अधिक नवीन नाटके दरवर्षी झाडीपट्टी रंगभूमीवर येत यशस्वी प्रयोग होत आहेत. आधुनिकीकरणाच्या प्रभावामुळे बदलत चाललेली मानसिकता,कौटुंबिक ताणतणाव, बदलती मनोवृत्ती,दुरावत चाललेले नाते, अत्याचार, शेतकऱ्यांच्या दुरावस्था,बेरोजगारी, स्वार्थ,हव्यास, अतिरेक, शेतकऱ्यांची दुरावस्था असे विविध विषय नाटकातून मांडल्या जात आहेत. वर्तमान स्थितीचे चित्रण असलेल्या संहिता, प्रभावी सादरीकरण , खळखळून हसायला लावणारा विनोद ,संगीत, प्रसंगानुरूप नेपथ्य , रसिका प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद यामुळे उपरोक्त नाटकांचे प्रयोग झाडीपट्टी रंगभूमीत होत आहेत . विविध वाहिन्या व चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या कलावंतांनाही प्रामुख्याने झाडीपट्टी रंगभूमी आकर्षित करते. सिनेस्टार मकरंद अनासपुरे,महेश जाधव ,समीर दंडाळे ,कविता कदम, प्रवीण वाघमारे हे कलावंत मंडळी झाडीपट्टी रंगभूमीवर येऊन अभिनय करतात. अशा कलावंतांना आकृष्ट करण्याचे सामर्थ्य असणारी रंगभूमी निश्चितच उज्वल आहे. इतरांना सामावून घेणे हे या रंगभूमीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. पंधरा वर्षापासून झाडीपट्टी रंगभूमीवर अभिनय करणारे कलावंत सुनील अष्टेकर यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कुटुंबीयापैकी कोणीही नसल्याने झाडीपट्टीतील कलावंतांनी पुढाकार घेऊन अंत्यविधी उरकला. अनिल ओव्हाळ सारख्या कलावंतांना आश्रय देऊन प्रसंगी उपचाराकरिता सहाय्य करण्याचे दातृत्व केवळ झाडीपट्टीतच असावे.

झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यप्रयोग:
            झाडीपट्टी रंगभूमीवर २०२३-२४ या सीझनला अनेक नाटके सादर झाली. चंद्रकमल थिएटर्स वडसा या प्रा.डॉ.शेखर डोंगरे यांच्या नाट्य मंडळाचे 13 नोव्हेंबर 2023 ला जामगिरी येथील प्रयोगापासून ते २५ मार्च २०२४ पिसेवडधा येथील 'पापी पुत्र' या नाट्यप्रयोगापर्यंत एकूण ११८ प्रयोग झाले आहेत.
(टाकलेलं पोर ३४, पापी पुत्र १४, बायकोपेक्षा मेहुणी बरी १०, कसोटी कुंकवाची ३०, रणांगण ७, फाटका संसार ९, बायको चढली डोक्यावर ६, पिसाळलेला ५, पंख तुटलेले पाखरू ३).श्री .गुरुदेव रंगभूमी वडसा यांचे ११९ , युवा रंगभूमी ,कलादर्पण रंगभूमी , रंगवैभव , एकता रंगभूमी ८०,धनंजय स्मृती , गणराज रंगभूमी , कलांकुर रंगभूमी श्री व्यंकटेश नाट्य मंडळ नवरगाव ,झाडीपट्टी रंगभूमी,
शिवम थिएटर्स , माई रंगभूमी , नाट्य नरेश रंगभूमी , प्रेरणा थिएटर्स , रंगकर्मी ,झाडीपट्टी मराठी रंगभूमी ,जय दुर्गा नाट्य रंगभूमी , रंगतरंग थिएटर्स , लोक जागृती झाडीपट्टी माय मराठी , नाट्यश्री ,प्रल्हाद नाट्य रंगभूमी ,संपदा रंगभूमी या प्रमुख नाट्य कंपन्याचे ५०पेक्षा अधिक बरोबरच इतर नाट्य मंडळांची ही नाटके झालेली आहेत. किंबहुना गावोगावच्या हौशी रंगकर्मींनी 
केलेल्या नाटकाची संख्याही महत्त्वपूर्ण आहे. ८ फेब्रुवारी २०२४ ला कुरुड येथे आक्रोश, स्पर्श काळजाचा, आघात, गहाण, शेवटची आंघोळ असे एका रात्री आठ नाट्य प्रयोग हाऊसफुल झाले. १८ जानेवारीला वासेरा येथे एकाच रात्री लाखात एक लाडाची लेक, उद्रेक ,बायको बिलंदर ,सासूच्या घरात सुनबाई जोरात व आभाळाची माया या नाटकांचे प्रयोग हाउसफुल झाले . नुकतेच २५ ऑगस्टला झाडीपट्टीतील चंद्रकमल थिएटरच्या बुकिंग कार्यालयाचे उद्घाटन झाले. तथा अनेक कार्यालय प्रयोगाकरिता सज्ज झाली आहेत. नवीन नाटकांच्या तालीमही सुरू आहेत.

वैभवशाली झाडीपट्टी रंगभूमी:
झाडीपट्टी रंगभूमीत नाट्यप्रयोग, नेपथ्य, संगीत, विनोद व रसिक असा प्रेक्षक वर्ग यामुळे वैभव कायम जपलेले आहे.
झाडीपट्टीतील नेपथ्यात प्रामुख्याने वीस बाय वीसचा जमिनीपासून चार फूट उंच रंगमंच उभारला जातो. समोरील प्रेक्षागृह ८०बाय ८० चें पडद्याने बंद केलेले असते.अर्थात बंद शामीयान्यात नाट्यप्रयोग होतो. हरिश्चंद्र बोरकर यांचा जुळा रंगमंच, सदानंद बोरकर यांचा फिरता रंगमंच व चुडाराम बल्लारपुरे यांचा भव्य रंगमंच झाडीपट्टीतील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणून सांगता येईल.चुडारामजी बल्लारपुरे यांचे 'महामृत्युंजय मार्कंडेश्वर 'हे महानाट्य तर अत्यंत गाजलेले. या नाटयाचे जवळपास 135 प्रयोग झाले आहेत . साडेसहा तासाचे, भव्य दिव्य स्टेज असलेले, ५१ कलावंत,१५ तंत्रज्ञांच्या माध्यमातून रंगभूमीवर सादर झालेले महानाट्य होते .25 बाय 25 फुटाचा स्टेज ,अंतराळात देव-देवतांचे प्रगटीकरण, भूताचा थयथयाट,,प्रत्यक्ष रंगमंचावर नदी वाहणारे दृश्य,शिवलिंग, त्रिनेत्र अशा वापरलेल्या विलक्षण कृलृप्तीमुळे हे नाटक पाहताना प्रेक्षकांना प्रत्यक्षनुभूतीचा आनंद मिळायचा. झाडीपट्टी रंगभूमीवरील नेपथ्यातील प्रायोगिकता या नाटकातून जाणवत झाडीपट्टी रंगभूमीचे वैभव प्रत्ययास येते. झाडीपट्टीतील नाटकांची समीक्षा करणारे ग्रंथ ही प्रकाशित करण्यात आले आहेत. धनंजय नाकाडे यांचे 'झाडीपट्टीची रंगभूमी' हिरामण लांजे यांचे 'समग्र झाडीपट्टी ',डॉ. हरिश्चंद्र बोरकर , डॉ.प्रमोद मुनघाटे, डॉ . श्याम मोहरकर यांचे 'शतकोत्तर झाडीपट्टी रंगभूमी',' झाडीपट्टी रंगभूमी: आकलन आणि आस्वाद', 'झाडीपट्टीचे प्रकाश रंग' नव्वदोत्तर झाडीपट्टी रंगभूमी :चिंतन आणि चिकित्सा' रंगकर्मी शेखर डोंगरे गौरव ग्रंथ हे प्रकाशित ग्रंथ एकूणच झाडीपट्टी रंगभूमीचा सर्वांगीण वेध घेणारे आहेत. डॉ संजय निंबेकर, डॉ .धनराज खानोरकर , डॉ.राजकुमार मुसणे, डॉ .दुर्गेश रवंदे, किशोर उरकुंडवार, डॉ. नरेंद्र आरेकर, डॉ. जनबंधू मेश्राम या नाट्य अभ्यासकांनी विविध लेखाद्वारे झाडीपट्टीची चिकित्सा करीत मर्मस्थळे उलगडवून दाखवीत आहेत. दरवर्षी किमान ३० नवीन नाट्यसंपदा देणारी, अडीच हजार प्रयोगाद्वारे तीस हजार अनुषंगिक लोकांना रोजगार देणारी ,चार महिन्याच्या सिझनमध्ये ७० करोडची उलाढाल करणारी वैभवशाली रंगभूमी म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी होय. रंगभूमीवर मागील पन्नास वर्षांपासून ५ हजार नाटकातून विविध भूमिका साकारणारे लोकप्रिय झाडीपट्टीतील नटसम्राट डॉ .परशुराम खुणे यांना नाट्य सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार महामहीम राष्ट्रपती मा.द्रोपदीजी मुर्मू यांच्या शुभहस्ते प्रदान करुन झाडीपट्टी रंगभूमीची दखल घेत सन्मान करण्यात आला. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

झाडीपट्टी रंगभूमीचे योगदान :
झाडीपट्टी रंगभूमीने प्राचीन लोक संस्कृती, रीतीरिवाज ,लोककलांच्या जतनाबरोबरच व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून रंजन व प्रबोधन केले आहे. पूर्व विदर्भातील झाडीपट्टीतील लोकभाषा अर्थात झाडीबोलीतील अनेक शब्दांचा , वाक्यप्रचारांचा सर्रास उपयोग नाटकातून करीत असल्यामुळे लुप्तप्राय होत असलेली झाडीबोली जिवंत ठेवण्यातही नाटकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सदानंद बोरकर यांचे 'दोन घरांचे गाव 'हे झाडीबोलीतील नाटक वैशिष्ट्यपूर्ण ठरले.हजारो हौशी रंगकर्मी व व्यावसायिक नाट्यकलावंतांनी रंगदेवतेची मनोभावे उपासनेने व अभिनयाच्या योगदानाने समृद्ध केले आहे.
एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात झाडीपट्टी रंगभूमीचे अस्तित्व स्वतंत्र आणि विलक्षण आहे.नवोदित नाट्य लेखक ,कलावंत, संगीतकार ,दिग्दर्शक नावारूपास येत आहेत, ही जमिनीची बाजू आहे. राजाश्रयाची अपेक्षा न करता नाट्यकलेची आवड व अस्मितेच्या जोपासनेतून जनसामान्य रसिकांच्या लोकाश्रयावरच बहरलेली झाडीपट्टी रंगभूमी वैभवशाली आहे.

प्रा. डॉ.राजकुमार मुसणे , गडचिरोली

0/Post a Comment/Comments