कैकाडी या भटक्याच्या वेदनांना उजागर करणारे गुरुदेव रंगभूमीचे 'पिंजरा' हे नाटक


कैकाडी या भटक्याच्या वेदनांना उजागर करणारे गुरुदेव रंगभूमीचे 'पिंजरा' हे नाटक



'पिंजरा' हे नाटक झाडीपट्टी रंगभूमीवरील कैकाडी ,फासेपारधी या दुर्लक्षित अशा भटक्या जमातीच्या वेदनांना उजागर करणारे , त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारे, त्यांच्य जीवनातील अडचणी ,पेज -प्रसंग व शोषणाचे चित्रण करणारे नाटक आहे. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही भटक्या जमातींचे वास्तव फारसे बदलले नाही. अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या हा समाज शिक्षणापासून जसा दूर आहे तसाच विकासापासून ही कोसो दूर आहे. पारंपारिक व्यवसाय साथ देत नाही नवीन व्यवसायासाठी भांडवल नाही, नवीन व्यवसाय करण्याकरिताचे अद्ययावत ज्ञान नाही .त्यामुळे कैकाडी या समाजाची होणारी दैना, परवड ‘पिंजरा’ या नाटकातून नाटककार दिलीप वडे यांनी व दिग्दर्शक गोपी रंधये यांनी साकारली आहे.
              नुकताच गुरुदेव नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत दिलीप वडे लिखित, गोपी रंधये दिग्दर्शित ‘पिंजरा’ या नाटकाचा प्रयोग आठ ऑक्टोंबर २०२४ ला घोट येथे झाला. संगीत ‘पिंजरा’ हे तीन अंकी नाटकविविध प्रवेशातून या कैकाडी जमातीतील विविध प्रश्न ,समस्यासह साकार होते. ‘पिंजरा’ या नाटकात लाव्हे ,तितर पकडणारा परांपारिकपणे मोहफुलाच्या सडवापासून मद्य निर्मिती करणाऱ्या एका छोट्या कुटुंबातील खडतर जगण्याची कहाणी आहे.कैकाडी समाजातील व्यसनाधीनता ही गंभीर समस्या नाटकातून दर्शविलेली आहे. वेळोवेळी पोलीस अधिकाराचा गैरवापरकरून गरीबाकडून लाव्हे,तितर व दारूही घेऊन जातात उलट जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवितात. अर्थातच व्यवस्थेकडून कैकाड्यांचे शोषण कसे होते, याचे चित्रण नाटकातून केले आहे
एकंदरीत पिंजरा या नाटकातून अन्याय , अत्याचार, गरिबांचा छळ ,शोषण, या विविध समस्यांना नाटककाराने हाताळले आहे. ‘पिंजरा’ या नाटकातून सिकलसेलग्रस्त, परिस्थितीने हतबल झालेला वामन( महेंद्र भिमटे), कौटुंबिक परवड सहन करत खडतर आयुष्य जगणारी कौशी ( वर्षा गुप्ते), दारिद्र्यामुळे लग्न न होणारी व व सुदर्शनच्या अत्याचाराला बळी ठरणारी दुर्गी ( तेजस्वनी खोब्रागडे), हाल अपेक्षेचे जगणे जगत प्रतिकूलतेवर मात करून केमिकल इंजिनिअरचे उच्च शिक्षण घेणारा व श्रीमंतांच्या अधीनस्थ असणारा स्वार्थी बारक्या( निखिल मानकर), श्रीमंतीच्या बळावर गरीब व महिलांचे शोषण करणारा अत्याचारी सुदर्शन ( राज मराठे),होतकरू तरुणास आपल्या प्रेम जाळ्यात ओढून मोह पाशात अडकणारी चतुर प्राची( शुभांगी राऊत) एका कुटुंबाची,संसाराची व्यथा ,दारिद्र य आणि दैन्यावस्थेचे चित्रण केले आहे. केमिकल फॅक्टरीचा मालक, पैशाचा माज असलेल्या धनदांडग्या श्रीमंतांकडून सुदर्शन (राज मराठे ). सारख्या सर्वसामान्य गरिबांचे कसे शोषण होते,हे या नाटकातून प्रत्ययास येते. किंबहुना सुदर्शन गरीब शेतकरी कुटुंबाच्या घरात घुसून हतबल दुर्गीवर बलात्कार करतो, धमकी देतो ,पदोपदी शेतकऱ्यांचा अपमान करतो. नैसर्गिक आपत्तीच्या पुरामध्ये सर्व कुटुंब वाहून गेल्याने सर्वस्व गमावल्याचे दुःख पाठीशी घेत अन्यायग्रतांच्या मदतीला स्वतःहून धावून जाणारा सामाजिक बांधिलकी जोपासणारा मोहम्मदभाई ( मुकेश गेडाम), या प्रमुख पात्रं बरोबरच नाट्य रसिकांना हास्याची मेजवानी देणारी विनोदवीर भटक्या जातीतील कैकाडू गोपी रंधये, वेगवेगळ्या आजारावर आयुर्वेदिक औषधी देणारी आणि भांडणे लावणारी व्यसनी इमली (दीपाली भराडे)पत्नी पीडित , हवालदार नागोराव (कल्लू शिंगरे) या पात्रांच्या माध्यमातून नाटक साकार होते. 

‘पिंजरा’ या नाटकाचे कथानक श्रीमंत धनदांडगे शेतकऱ्यांकडून जमीन कसे बळकावतात ,गरिबावर सर्वतोपरी अत्याचार कसे करतात, श्रीमंतांच्या अत्याचाराला गरिबांच्या स्त्रिया बळी कशा पडतात, गरीब कुटुंबातला होतकरू तरुण शिकून स्वतःचं अस्तित्व सिद्ध केला तर त्याला श्रीमंतांच्या मुली प्रेमजाळात कसे अडकवतात आणि मनमर्जीने कशा वागायला प्रवृत्त करतात, या विविध प्रवृत्ती पिंजरा नाटकातून नाटककार दिलीप वडे यांनी मांडलेल्या आहेत. 

कैकाडू, इमली,हवालदार यांच्यातील प्रसंगोपात विविध पंच व जुगलबंदीने विनोद निर्माण होऊन प्रेक्षक मस्त हसतात. तसेच झिंगलेली इमली अवास्तव बडबडते, मोहम्मदभाईशी तुटकी फुटकी हिन्दी बोलते अन प्रेक्षक प्रचंड हसतात. 
सिकलसेल रुग्णग्रस्त दारिद्रयामुळे अपत्यही जन्मास न घालणारा, जीवनात प्रचंड तडजोड करणारा वामन, गरिबीमुळे शिक्षण घेऊ न शकणारी दुर्गी,सहनशील ,सोशीक कौशी ,झगडे लावणारी इमली,गरोदर दुर्गेला अत्याचार करणाऱ्याचे नाव सांगता येत नाहीं तिची मुस्कटदाबी ,कुचंबना, हसती खेळती दुनिया नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेला,लव्हजिहादचां आरोप झुगारणारा,माणुसकीने जगणारा मोहममद,बदफैली,बाजारबसवी म्हणत हेळसांडीने कुत्सित जिने जगणारी दुर्गी ,नकली औषध विकल्यामुळे जेलमध्ये जावे लागणारा बारक्या,कपटी,घमेंडखोर बाईला किडनी देणारा वामन अशा विविध प्रवृती समाजासमोर मांडण्यात नाटककार,दिग्दर्शक व कलावंत यशस्वी ठरले. 
 गीत ‘तुझ्या नि माझ्या.....बेधुंद हा गारवा’,‘लय दिवसानं मिळाला मोका जवळ येना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे’ ,’गरिबांचा हात’,‘चांदण्यापरी सखे रूप तुझे’, ‘गेली गेली मनाची खुशी, बायको भेटली दादा लंवंगी मिरची जशी’, अशा गीतांमुळे व निखिलच्या मधुर गायनाने प्रेक्षक तल्लीन होतो.गोपी रंदये, दीपाली भराडे,कल्लू शिंगरे या त्रिकुटाची हास्योत्पादक जुगलबंदी,मुकेश गेडाम,महेंद्र भिमटे,निखिल मानकर व राज मराठे यांच्या भारदस्त संवादफेक , वाचिक व कायिक अभिनयामुळे नाट्य प्रयोगात चांगलीच रंगत आली. 
  नाटकातील संवाद प्रभावी आहेत. ‘दुकान फुटाण्याचे अन शान बादशाहाची’, ‘हिंदू और मुस्लीम से बडी हैं इन्सानियत’,‘ पहा, शिक्षणाचा फायदा,नोकरी त नोकरी वरतून छोकरी’, कुट नीतीच्या पिंजऱ्यातून कोणीच बाहेर काढू शकत नाही.’,‘लग्न करुन विनाकारण आचारसंहिता घरात आणली’, ‘दंडा सरकारनं दिला पण अधिकार बायकोचाच’, बारक्या : “दादा डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि जो प्राशन करेन तो गुरुगुरल्या शिवाय राहणार नाही... हो मान्य आहे, आपली चादर तेवढी मोठी नाही. पण तीच चादर पाहिजे तेवढी वाढवण्याची क्षमता मला या शिक्षणानं उपलब्ध करून दिली आहे.आपली जात ही अनुसूचित जमाती म्हणून ओळखली जाते. पण तिला कुठेतरी स्थित्यंतर द्या. अरे सरकारी योजनांचा फायदा घ्या.’’
वामन म्हणतो “आईच्या पोटात एकाच नाळेवर वाढलो दोघही. आज ती नाळच तू कापून टाकलास... म्हणे माझ्या लग्नात तुम्ही शोभले नसता, याच भिकाऱ्याने पोटाला चिमटा घेऊन तुला शिकवला. तुला काही कमी पडू दिलं नाही .माझा भाऊ शहरात गेला इंजिनीयर बनून येईल अस आल्या -गेल्या जवळ, नातेवाईकांजवळ अभिमानानं सांगत होतो. माझी बायको आपल्याला मूल व्हावे म्हणून डॉक्टरकडे जाऊन चेक करा असा तगादा लावायची, मी दुर्लक्ष करायचो,तिला समजावलं , म्हंटलं नाहीच झालं आपणास मूल तर बारक्यालाच आपला पोरगा म्हणू, त्याच्या लेकरातच आपला आनंद मानू. .. माझ्या नशिबात देवाने दगड-धोंडे लिहून ठेवले होते.एवढीही शेती गेली असती तरी मला दुःख झालं नसतं, पण तुझ्या बायकोने भिकारी म्हणून माझा उद्धार केला. एकाच वेळेत शेकडो तलवारी काळीज कापत गेल्याचा भास झाला. त्याच वेळेस मला अटॅक का आला नाही.? देवा ..देवा का असा दिवस दाखवलास माझ्या नशिबात.. मी हरलो देवा आज माझ्या सर्वस्वावर दरोडा पडला आहे.. मी पूर्णपणे कंगाल झालो देवा ... हाडामासाचां पिंजरा घेऊन कुठे फिरू.’’ अशा प्रभावी संवादामुळे नाट्याशय परिणामकारकपणे प्रेक्षकांना विचार प्रवृत्त करतो.
आर्गान /की बोर्ड जयप्रकाश बावनथडे, तबला पुरुषोत्तम, दडमल, ऑक्टोपॅड किशोर जोंधुळकर यांची उत्तम संगीतसाथ, निखीलच्या मधूर स्वराने प्रयोगाच्या सादरीकरणात चांगलीच रंगत आणली. दिग्दर्शक गोपी रंधये यांनी नेपथ्यात केलेल्या बदलामुळे ही प्रयोग गतिमान झाला. विविध घरे असलेल्या गावाचे दृश्य दाखवणारा समर्पक प्रवेश पडदा वापरल्यामुळे दोन वेगवेगळया कुटुंबाची कथा एकाच प्रवेशात साकार झाल्याने नाटक पुढे सरकत गेले, हे दिग्दर्शक गोपी रंधये यांचे कसब निश्चितच कौतुकास्पद आहे.

नाविन्यपूर्ण विषय ,प्रभावी सादरीकरण, पोट धरून हसायला लावणारा विनोद,सर्व कलावंतांचा चतुरस्त्र अभिनय व दिलखेचक नृत्यामुळे ' पिंजरा ' नाटक प्रेक्षकांनाही आवडले. विविध विषयांना कवेत घेणारे , निश्चितच सर्वाँना आवडणारे असे 'पिंजरा 'नाटक सर्वांनी आवर्जून पहावे ...

प्रा. राजकुमार मुसणे,गडचिरोली
9423639532

0/Post a Comment/Comments