दिवाळीपूर्वीच झाडीपट्टी नाटयप्रयोगाचे सीजनला सुरुवात


दिवाळीपूर्वीच झाडीपट्टी नाटयप्रयोगाचे सीजनला सुरुवात


बंधन:  प्रेमाचे, विश्वासाचे, नात्याचे,विचाराचे, सत्यनिष्ठेचे अन् न्यायप्रियतेचे 

कुटुंब वा समाजातील नात्याची उभारणी ही आपुलकी, जिव्हाळा, आत्मीयता, प्रेम, माया यावरच अधिष्ठित असते. नातं मग ते कोणतेही असो आत्मीयतेबरोबरच बंधन असतंच. नातं निर्माण करणे आणि ते टिकवणे यासाठी बंधन फार महत्त्वाचे. व्यावहारिक जीवनातील नातं,(रिलेशनशिप)  अथवा व्यवसाय यातील कमिटमेंट अत्यंत महत्त्वाची असल्याचा विषय संगीत'बंधन ' या तीन अंकी नाटकातील १६ प्रवेशातून नाट्य लेखक देवेंद्र दोडके यांनी यशस्वीपणे हाताळला आहे . घर, संसार, व्यवसाय यातील विश्वास,बांधीलकी व निष्ठा कशी महत्त्वाची असते, याचे चित्रण या नाटकातून केले आहे.नातं हे  आपुलकीच्या नाजूक आणि घट्ट धाग्यांनी विणलेले असते.त्यामुळे विविध बंधनात सगळी माणसं ,नातेवाईक बांधलेली असतात, याचे चित्रणबंधन या नाटकात विविध प्रसंगाद्वारे नाटककाराने  केला आहे. नुकताच ४ ऑक्टोबरला गडचिरोली जिल्ह्यातील घोट येथे गायत्री रंगभूमी प्रस्तुत देवेंद्र दोडके लिखित व दिग्दर्शित बंधन अर्थात प्रेमाला उपमा नाही , या नाटकाचा यशस्वी प्रयोग  झाला.
 'बंधन' हे सभोवतालच्या दैनंदिन घटनांचे पडसादाचे चित्रण करणारे नाटक आहे .सभोवताल घडणाऱ्या विघातक कृत्यांमुळे बेचैन झालेली संवेदनशील स्त्री सुजाता विदारता डोळसपणे पाहत झपाटते ,पेटून उठते अन्  विघातकतेविरुद्ध विद्रोह करते . अन्याया-अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वकिलीचा पेशा स्वीकारून न्यायासाठी धडपडते.सभोवताचा अमानुष अन्याय - अत्याचार सुजाताला पाहवत नाही.तीन वर्षाच्या लहानशा चिमुकल्या बालिकेवर होणारा अत्याच्यार ते सत्तर वर्षीय वृद्ध महिलेवरील बलात्कार अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सभोवतालच्या विविध  स्त्री अत्याचाराच्या घटनां काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत घडत असतात. स्त्रियांवर विविध मार्गाने अत्याचार केले जातात.बलात्कारानंतर याची वाच्यता कुठेही होऊ नये म्हणून क्रूरकर्म लपविण्यासाठी पेट्रोलने पेटवले जाते. अशा असंख्य घटना घडतात.अशा अ मानवीय घटनांमुळे उद्विग्न, व्यथित होणारी सुजाता क्रूर, पाशवी, नराधमांना कडक शिक्षा देण्यासाठी व अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी वकिलीचा पेशा स्वीकारून संघर्ष करते. अशा  अमानुष घटना कुठेही  घडू नयेतं ,समाजातल्या कोणत्याही चिमुकलीवर अत्याचार होऊ नये यासाठी न्यायाचा मार्ग व्रतस्तपणे अंगीकारते.या तिच्या समाजकार्यातील अनेक अडथळ्यावर सचोटीने मात करून तिने  उचललेल्या  विड्यामुळे ती त्यात यशस्वी कशी होते, हेच बंधन या नाटकाचे कथाबीज असून नाटक पाहिल्याशिवाय त्यातले खरे मर्म कळणार नाही. एडवोकेट सुजाताला प्रत्येक कार्यात तत्परतेने  तिचे पती  पोलीस इन्स्पेक्टर सत्यजित अभ्यंकर  साथ देतात.
 ॲड.सुजाता या प्रमुख पात्राबरोबरच स्त्री अत्याचाराचे विविध पदर उलगडणारे   नाटक प्रेक्षकांना डोळस करीत अंतर्मुख करणारे विचारनाटय आहे.  खल प्रवृत्तीचा अवैद्य मार्गाने प्रचंड संपत्ती जमवणारा कोळसा माफिया,  " गीद्ध की नजर ,भेडिया की चाल, चिते की होशियारी से बना' असे  रतीराम सिंघानिया (सिनेस्टार देवेंद्र दोडके), स्वैरपणे जगणारा उधळपट्टी करणारा उनाड मुलगा नंदलाल,(प्रा. संतोष बारसगडे),  गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी  आटोकाट प्रयत्न करणारा प्रमाणिक पोलीस इन्स्पेक्टर सत्यजित अभ्यंकर (चिदानंद सिडाम), अत्याचारीत्यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारी रणरागिणी 'दिमाग  से तेज ज्ञान से परिपूर्ण' अशी युक्तिवादात निपुण एडवोकेट सुजाता (रजनी नागपूरकर), बंधू आणि वहिनीवर प्रचंड प्रेम करणारा विवेक (विशाल बावणे), न्यायाची याचना करणारा गणपत ( सिद्धार्थ कोवले)आपल्या अभिनय सामर्थ्याने व कल्पकतेने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे विनोदवीर   नारू (मयूर चन्ने), निर्मला , (रूपाली). हरी (लुकेश फुलबांधे), कलेसाठी जगणारी व कलेला अधिक महत्त्व देणारी नृत्यांगना रेखा (अरुणा ठवरे  ), विवेक वर प्रेम करणारी आधुनिकवृत्तीची पण सोज्वळ अशी नक्षत्रा (प्रणाली बैलमारे) या पात्रांच्या माध्यमातून नाटककाराने एक चांगला विषय प्रेक्षकापर्यंत उत्तमरीत्या पोहोचविला आहे..

पारंपारिक झाडीपट्टी रंगभूमीपेक्षा थोडे बदल करून नावीन्यपूर्णतेने प्रयोग सादर केल्याने रसिकांनी चांगलीच पसंती दर्शवली. नायिका रजनी नागपूरकर यांची उत्स्फूर्त अभिनय, प्रभावी संवाद फेक , बोलका चेहरा , प्रसंगानुरूप आकर्षक वेशभूषा , वाचिक,कायिक-सात्विक अभिनय वाखाणण्यासारखाच.
विशेषत: खलनायक हा माईक समोर जाऊन कर्णकर्कश आवाजात ओरडण्यापेक्षा सिनेस्टार देवेंद्र दोडके यांनी वाचिक,कायिक व सात्विक अभिनयाद्वारे खलनायक उत्तमरीत्या साकारला. कुठेही आक्रमक, आक्रस्ताळेपण न करता प्रभावी संवाद फेकीतून खलनायक जिवंत केला. ही या नाटकाची जमेची बाजू होती. बलात्काराचा स्त्री अत्याचाराचे धिंडवडे करणारा प्रसंग रंगमंचावर दाखवण्याचा घृणास्पदप्रकार  जाणीवपूर्वक टाळल्यामुळे नाटककार, दिग्दर्शक व निर्मात्याचे कौतुकच करावे लागेल. निश्चितच झाडीपट्टी रंगभूमी कात टाकून काळानुरूप बदल स्वीकारते आहे, हे प्रकर्षाने जाणवले.
बंधन या नाटकातील संवाद  जबरदस्त आहेत.
"सुजाता (रजनी): दिवसेंदिवस स्त्री अत्याचारात वाढच होत चालली आहे. यासाठी कडक शिक्षेची तरतूद असावी. सौदी अरब सारखे  तात्काळ फाशीची शिक्षा  द्यावी. हैवानाना जिवंत जाळून टाकले पाहिजे,रंणचंडीकेचे रूप धारण करून अत्याचार करणाऱ्या नराधमाचे अवयवच छाटायला हवे, सर्वांनी पेटून उठायला हवे,   रक्त हवय मला , रक्त ..." या संवादास तर प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या दिल्या.' ही कसली लोकशाही ही तर हुकमशाही? हा प्रश्न अंतर्मुख करणार आहे.
'माणसे बांधली जातात ती बंधनानेच ',
रेखा: आम्ही कलावंत आहोत कला सादर करून जगतो.आम्हाला गरिबाला का जगण्याचा अधिकार नाही? 
रतिराम सिंघानिया : पैसा कमवायला अन् टिकवायला बुध्दी लागते.'
 'जो मला हलक्यात घेतो तो मसणात जातो,'
'गीध की नजर ,भेडिया की चाल, चिते की होशियारी से बना  रतीराम सिंघानिया अशा प्रभावी व भारदस्त संवादामुळे व अभिनयाने नाट्य रसिक आकर्षिला जातो.

"ताल सुरांनी आळवितो मी रिद्धी सिद्धीच्या वरा 
तुला नमितो ........"या नांदीने सुरू झालेले संगीत नाटक
सजल नयन नित धार बरसती. या भैरवीने संपते.

  गीतकार प्रा.संतोष बारसागडे यांचे नाट्य आशयाशी वाहक गीते व 
शब्दातून गीत साकारणारा  पहाडी आवाजाचा 
स्वरबहार विशाल बावणे यांच्या उत्तम गायनाने प्रयोगात चांगलीच रंगत आणली..  'माझी वहिनी तू माझी वहिनी '' सजने सजणे ना मिठीत ग, वेडा झालो तूझ्या प्रीतीत ग ",मी कशी ओळखू प्रीती,प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे ',गीत  होऊ दे स्पर्श तुझा, बघणार नाहीं कुणी, ये ना जवळी ,' झळुख आली वाऱ्याची हात हाती दे ना मला ,दूर चांदण्या रातीला चंद्र होता साथीला, तुला पाहूनिया ढगाआड गेला', "होती उरामंधी माया तरी ढगाळ फाटलं, विखुरला मळा माझा मनी काहूर दाटलं "भावगंध त्या जळी मिसळती ' या अतिशय सुंदर गीतांमुळे, लावणी तथा प्रत्येक अंकानंतरच्या रजनी नागपूरकर यांच्या रेकॉर्डिंग डान्समुळे संगीताची उत्तम मेजवानी प्रेक्षकांना चाखता आली.
विनोदी पात्र नारू(मयूर चन्ने-), हरी (लंकेश फुलबांदे), निर्मले(रूपाली ठाकरे) , रेखा (अरुणा ठवरे) यांच्यातील जुगलबंदीतून विनोद निर्माण होतो व प्रेक्षक हसायला लागतात.
घरमालक व भाडेकरू यांच्यात भाड्याच्या पैशावरून निर्माण होणारा विनोद प्रेक्षकांना हसवतो. वय उलटून गेल्यावरही लग्नासाठी आसुसलेला नारू (मयूर चने ), व निर्मला यांच्यातील प्रेमसंबंधातून निर्माण होणारा विनोद खळखळून हसवणारा आहे.पोचकपुंगा, देवगाय, कार्बोरेटरमध्ये कचरा अडकला, पिकप कमी झाला अशा शाब्दिक विनोदामुळे प्रेक्षक हसायला लागतो. नाट्य आशयाशी विसंगत असला तरी प्रेक्षकांना खुर्चीला खेळवून ठेवणारा विनोद निश्चितच आहे.टीव्हीवरील बातम्यांचा कलात्मकतेने केलेला वापर व न्यायालयाचे नेपथ्य प्रयोगाची परिणामकारकता वाढवते. तिसऱ्या अंकातील न्यायालयाचा प्रसंग हा नाटकातील सर्वोत्तम आहे.

संगीत साथ देणारे तबलावादक आकाश मडावी ,आक्टोपॅड   संदीप उईके व विविध प्रसंगात परिणामकारकतेकरिता आर्गन मास्टर चेतन तुमराम यांचेही योगदान वाखाण्यासारखेच.नेपथ्य-  रमेश आर्ट, ध्वनी व प्रकाशयोजना - नाकाडे डेकोरेशन, प्रयोग सहाय्यक उत्तम मेश्राम आणि शुद्धोधन खोब्रागडे  होते.. या सर्वांच्या योगदानाने नाटय प्रयोग यशस्वी झाला.

दीर विवेकवर पुत्रवत प्रेम करणारी वात्सल्यमूर्ती, पती सत्यजितची काळजी घेणारी काळजीवाहक, निशावरील बलात्काराने उद्विग्न होणारी संवेदनशील,बलात्काराने आयुष्य बरबाद होतं. घर उध्वस्त होतं म्हणत पेटून उठणारी, आमिषाला बळी न पडता
पैसे धिक्कारत सिंघानियाला खडसावत चालते व्हा म्हणणारी आक्रमक,.विनयने नक्षत्राशी लग्न केल्याचे समजताच सर्वस्व गमावल्याचे दुःख होणऱ्या सुजाताचे अनेक पैलू नाटकातून साकारतात.कायद्याचे रक्षण करणारा सत्यजित गुन्हेगाराला आळा घालतो. पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन करतो. विवेक भाऊ-बहिणीच्या आश्रयाखाली लहानाचा मोठा होत कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेऊन बलात्कार करणाऱ्याची  केस लढवतो. भाऊ बहिणीच्या विरोधात जाऊन नक्षत्राशी लग्न करतो.तर अवैधमार्गातून संपत्ती वाढविणे,खोटी माहिती देणे ,फसविणे, दिशाभूल करणे, केस लढण्यासाठी लालच दाखविणे,स्वार्थासाठी वाटेल ते करणारा कायदा मोडणारा रतन सिंघानिया , खल प्रवृत्ती कितीही फोफावली तरी मात्र सत्याला मरण नाही, सत्य हे अबाधित राहते ', 
अमिषाला बळी न पडता सत्याच्या बाजूने ठाम उभी राहणारी ॲड.सुजाता अशा विविध प्रवृत्तीचे दर्शन नाटककाराने घडविले आहे. शेवटी भारतीय दंड संहितेच्या ३७६ व ३०२ कलमान्वये नंदलालला बलात्काराच्या व खुनाच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा दिली जाते' या प्रसंग पाहून प्रेक्षक प्रचंड टाळ्या वाजवतात. कलावंतांच्या सरस अभिनयामुळे नाटय प्रयोग दमदार झाला. झाडीपट्टी रंगभूमीच्या कक्षा रुंदावणारे एक नवा विचार देणारे,स्त्रियांच्या मनामध्ये आत्मबळाबरोबरच कायदेविषयक जाणीवजागृती करणारे '' नाटक 'आहे.

नाटक हे अनुभवण्यापेक्षा पाहण्याचे असते त्यामुळे प्रत्यक्ष नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे हे उत्तम नाटक आहे. निश्चितच दुर्गादेवी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित नाट्यप्रयोगामुळे देवीतील रणचंडीकेचे रौद्ररूप प्रेक्षकांना भावले.
एकंदरीत.आपुलकी,  प्रेमाचे, विश्वासाचे, नात्याचे,विचाराचे, सत्यनिष्ठेने जगणाचे, न्यायप्रियतेचे असे विविध पदरी बंधन नाट्य लेखक देवेंद्र दोडके यांनी बंधन या नाटकातून दर्शविलेले असल्याने 
प्रेक्षकानी हे  नाटक अवश्य बघावे  ....

प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली
         9423639532

0/Post a Comment/Comments